संस्कृत सुभाषित अर्थ रसग्रहण
विधिनाललाटलिखितं
मार्जितुं कः क्षमः।
भाळावर लिहिलेलं कोण पुसू शकणार आहे?
पत्रं
नैव यदा करीरविटपे दोषो वसन्तस्य किम्।
नोलूकोऽप्यवलोकते
यदि दिवा सूर्यस्य किं दूषणम्।
धारा
नैव पतन्ति चातकमुखे मेघस्य किं दूषणं
यत्पूर्वं
विधिनाललाटलिखितं तन्मार्जितुं कः क्षमः॥ (नीतीशतक)
अर्थ :- अहो, वसंतऋतूमध्ये सुद्धा करीरवृक्षास पाने फुटत नाहीत, हा काय वसंताचा दोष आहे? घुबडाला दिवसा दिसत नाही, यात सूर्याचा काय दोष? चातकाच्या मुखी चोचीमध्ये वृष्टीच्या धारा पडल्या नाहीत तर त्यात मेघाच दोष काय? तात्पर्य असेच की, आधीच विधीने दैवयोगाने जे कपाळावर लिहिले आहे ते पुसून टाकण्यास कोण समर्थ आहे?
टीप- राजर्षी भर्तुहरी आयुष्याच्या उत्तर काळात नाथपंथी जोगी झाले होते, भर्तृहरीचा दैववादावर ठाम विश्वास असून त्याने ते दैवपद्धती विषयविभागातून संकलित केलेल्या श्लोकांमधून मांडलेले दिसून येते. करीर वृक्ष, राजस्थानातील काही भागात आढळणारा हा बाभळीसमान काटे असणारा वृक्ष आहे. यावर वर्षातील अधिकांश काळ पाने नसतात. याची शेंदरी रंगाची फुले आयुर्वेदात औषधीसाठी उपयोगात आणली जातात. या श्लोकार्थाशी साम्य दाखावणार्या हिंदीतील ओळी अशा,
कोई न दूर कर सके, विधि के लिखित अंक ।
सागर भी
पिता चन्द्र का, धो न पाया कलंक ।।
दैवाची उलटी गती विपरितता कोण दूर करू शकतो अहो समुद्राचा पिता मानल्या गेलेल्या चंद्रावरचा डाग देखील समुद्र स्वतःकडे विपुल पाणी असूनही धुवू शकत नाही. हे केवढं दुर्दैव म्हणायचं? वाह! काय सुंदर कल्पनाविस्तार केलाय कवीने इथे. संतकवी तुलसीदासही ह्या नियती विषयी लिहितात,
तुलसी
जस भवितव्यता तैसी मिलै सहाय।
आपु न आवै ताहि पै ताहि तहाँ लै जाय॥
गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात की जे घडायचं असतं तसेच वळण मनुष्याच्या जीवनाला मिळते. घटीत भाग्य किंवा अभाग्य स्वतःहून माणसाकडे येत नाही तर माणसाचे आयुष्यच त्याला घटीतापर्यंत घेऊन जाते. सांगणं हेच की जे भवितव्य आहे ते घडतेच त्यासमोर कोणाचेही काही चालत नाही. संतकवी सैना भगतही लिहितात की,
संपत्ति
विपत्ति को जो धिक्के सो कूर।
राई घटे न तिल बढ़े विधि लिख्यो अंकूर॥ ~ सैन भगत.
संपदा आणि विपदा दोन्ही परिस्थितीमध्ये आनंदी होणं किंवा दुःखी होणं जरी मनाच्या भावनांच्या आवेगानं होत असले तरी ते तात्कालिक व खोटे समजावे. कारण जे तुमच्या भाग्यात नियतीने लिहिलेले असते त्यात राईइतकी (मोहोरीएवढी) ही घट होणे शक्य नाही आणि तिळाइतकीही वाढ होणे अशक्य. याच अर्थाचा अजून एक दोहा आहे.
भाल
लिखौ जू विरंचि वह घटे बढै कछु नाहि।
मरुधर
कञ्चन मेरु-सम जान लेहुँ मनमाहि॥
म्हणूनच म्हटले जाते, समय से पहले
और भाग्य सें ज्यादा किसी कों कुछ नहीं मिलता ।