दुबळ्याने समर्थाच्या आश्रयाने रहावे Sunskrit Subhashit

दुबळ्याने समर्थाच्या आश्रयाने रहावे Sunskrit Subhashit

 20-3-2022

संस्कृत सुभाषित रसग्रहण 

Sunskrit Subhashit 

दुबळ्याने समर्थाच्या आश्रयाने रहावे



आजची सुभाषित लोकोक्ती :-

स्वभावमृदुराप्नोति क्षेमं दृढसहायतः ।

अशेषरसमादत्ते रसना दशनाश्रयात् ॥

                             - कवितामृतकूप.

अर्थ :-

       मवाळ स्वभावाची (दुबळी) व्यक्तीदेखील बलवंतांच्या सहाय्याने स्वतःचे क्षेम (कुशल) प्राप्त करते. आता हेच पहा ना, जीभेसारखा मृदू अवयवही कठोर व दृढ अशा दांतांच्या आश्रयाला राहून त्यांच्या सहातय्याने सर्व रसांचा आस्वाद घेतो.

टीप -

क्षेमं दृढसहायतः। बलवंतांच्या, सबलांच्या सहवासात राहिल्याने अबलांना व दुर्बलांनाही सुरक्षितता लाभते असेच हे वचन सांगते. थोडक्यात काय तर दुबळ्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी बलवानांच्या सोबतीने रहावे असे सुभाषितकार कवीला सांगायचे आहे. या आधी आपण सुवचनानि १०२ मध्ये 'देवो दुर्बलघातकः' या लोकोक्तीवेळीही 'दुर्बल' ह्या विषयी ऊहापोह केली आहे.

       दुबळ्यांना भय सबळांचे असतेथे याचसाठी की ते सबळांकडून नागवले जातात. मात्र दुबळी व्यक्तीही बलवंतांच्या सहवासात सुरक्षीत राहू शकते ते कसे? हे सोदाहरण पटवून देण्यासाठी सुभाषितकाराने 'जीभ व दात' यांचा दृष्टांत श्लोकामध्ये योजला आहे. असे जरी असले तरी जिभेची शक्ती सगळेच जाणतात. आधी आपण शलोकार्थाच्या दृष्टीकोनातून पाहू जीभ मृदू, कोमल असली तरी दांतांच्या आश्रयाने केवळ सुरक्षितच नाही तर अशेष (समस्त , एकूणात चवीच्या सगळ्याच) रसांचा आस्वाद घेते. ही एक गोष्ट महत्त्वाची. याबरोबरच दातांच्या आश्रयाने जीभ केवळ पदार्थाच्या स्वाद (रस) वैशिष्ट्याचे आकलन करून देणारे ज्ञानेंद्रियच नाही तर त्याबरोबरच जीभ ही वाचा (वाणी) आहे. स्वरयंत्र, जीभ व तोंडातील दातांपासून ते टाळू, ओठ इ. घटक अवयवांच्याच्या सहाय्यानेच मनुष्य बोलतो, शब्दोच्चार करू शकतो. 

      इसवीसनाच्या ‌आधी चीनमधे होऊन गेलेला विख्यात दार्शनिक कन्फ्यूशियसने आपल्या शिष्यांना  नम्रपणा व लवचिकता यागुणांचे महत्त्व सांगताना जिभेचं उदाहरण दिले. तो एकदा शिष्यांना म्हणाला की आपल्या मुखात जीभ असते ती मृदू, कोमल व लवचिक असते त्याविरूद्ध असलेले दात मात्र कठोर दृढ व हट्टी असतात. जीभेचा स्वभाव मवाळ तर दातांचा कठोर असतो. हेच कारण आहे की नम्रपणा व लवचिकता यागुणांमुळे दांताच्या सान्निध्यात राहूनही जीभ शेवटपर्यंत मानसासोबत असते तर दात कठीण, कठोर, हट्टी असल्याने आधीच नष्ट होतात, त्यामुळे नेहमी नम्र व परिस्थितीनुसार लवचिक राहा.  

     जीभेचं अजून एक वैशिष्ट्यं हे की मनुष्य कितीही म्हातारा झाला तरी जीभ ही सदैव मनासारखी तरूणच असते. जणू जिभेला चिरतारूण्याचं वरदान आहे. माणसाला वृद्धत्व आलं डोळे, कान अशी इतर इंद्रिये क्षीण झाली तरी जीभ मात्र शेवटपर्यंत चपळ असते. तिचा आवेश दात पडून गेले तरी कायम असतो ती म्हातारी होत नाही.

     आशाच एका श्लोकामध्ये दात आणि जिभेचा मजेदार संवाद येतो,

दन्ता वदन्ति जिह्वे त्वां दशामः किं करिष्यसि।

एकमेव वचो वच्मि यूयं सर्वे पतिष्यथ ॥


याचाच हिंदी अनुवाद एका कविने केलेला आहे. 


दंत कहे जीभ को हम बत्तीस तू अकेली माय ।

एकबार चाव जाऊ तो, फिर्याद कहाॅ जाय ।

जीभ कहे दंत को तुम बत्तीस मै हुं अकेली माय। 

एकबार तेढी चलु तो बत्तीसी गिरजाए ।।


मराठी अर्थ :- दात जिभेला अहंकारात येऊन म्हणतात की, हे जिभे  तू एकटीच आहेस आणि आमची संख्या तुझ्याहून खूप जास्त आहे. आम्ही ३२ आहोत, आम्ही सगळे एकत्र आलो तर तुझी दशा काय होईल आणि तु आमची तक्रार कोणाकडे करशील याचा कधी विचार केला आहेस काय? आमच्या संख्येसमोर तू एकाकी पडशील तेव्हा काय करशील? तेव्हा हजरजबाबी अशी जिव्हा उत्तर देते की, तुम्ही बहुसंख्य असलात आणि मी एकटीच असले तरी मला त्याची चिंता नाही. मी एखादंच असं काही वाक्य बोलू शकते की जे केवळ उच्चारताच तुम्ही सगळे बत्तीसच्या बत्तीस एकजात पाडले जाऊ शकता.

       डॉ. रूपचंद्र शास्त्री (मयंक) यांनी लिहीलेले काही सहज समजतील असे दोहे माझ्या संकलनात आहेत. ज्यात त्यांनी जीभेच्या चांगल्या व वाईट गुणांविषयी लिहिले आहे. विस्तारभयास्तव त्यातील दोन तीनच देतो. 


समझदार होती अगर, मुख में घिरी जबान ।

करते बत्तीस दाँत क्यों, रखवाली दरबान ॥

बित्ते भर की जीभ से, अपने बनते गैर ।

बिना मोल बिन भाव के, हो जाता है बैर ॥

कोमल है जब जीभ तो, बोलो कोमल बोल ।

सम्बन्धों के खेल में, वाणी है अनमोल ॥


जिव्हेवर अजून एक सुभाषितकार म्हणतो -

जिव्हे प्रमाणं जाणिहि भोजने भाषणेSपि च । 

अतिभुक्तीरतिवोक्ति सद्यप्राणापहारिणी ।।

अशी अनेक सुभाषिते जीव्हा या विषयावर आहेत. 


       क्षेमं दृढसहायतः। ही लोकोक्ती दुबळ्यांना बलवंतांचे सहाय्य घेण्यास सांगते मात्र याच्या अगदी विपरीत विचार एका अभंगात तुकारामाने मांडला आहे. दुबळ्यांच्या एक दुर्गुण त्यातून सांगितला आहे. त्या अभंगातील पहिली दोन पदं अशी,

दुबळें सदैवा । म्हणे नागवेल केव्हां॥१॥

आपणासारिखें त्या पाहे । 

स्वभावासी करिल काये ॥धृ॥

        दुबळा मनुष्य असा विचार करत असतो की जो बलवान आहे तो कधी दुबळा होईल अन् नागवला जाईल! बलवंताला तो आपल्यासारखाच करु पहातो, असा त्याचा स्वभाव असतो त्याला तो तरी काय करील? 

         असो क्षेमं दृढसहायतः। विषयी बोलण्या ऐवजी जीभपुराणच अधिक झाले. त्यामुळे थांबतो.

संकलन व टीप :- अभिजीत काळे 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post