27-5-2022
सतत वाढणारी सज्जनांची मैत्री -
संस्कृत सुभाषित रसग्रहण -
sunskrit-subhashit
आरम्भगुर्वी क्षयिणी क्रमेण
लघ्वी पुरा वृद्धिमती च पश्चात् |
दिवसस्य पूर्वार्धपरार्धभिन्ना
छायेव मैत्री खलसज्जनानाम् ॥११८॥
- 'नीतिशतक'.
अर्थ :- दिवसाच्या पूर्वार्धातील व उत्तरार्धातील सावलीप्रमाणे (सावलीच्या वेगवेगळया गुणधर्मानुसार) दुष्टांची व सज्जनांची मैत्री असते. (ती कशी? तर पहा,) सकाळची सावली ज्याप्रमाणे सुरुवातीला मोठी पण पुढे पुढे कमी कमी होत जाणारी असते तशी दुष्टांची मैत्री प्रारंभी जास्त पण पुढे कमी कमी होत जाते. दुपारनंतरची सावली सुरवातीला लहान पण नंतर वाढत जाणारी असते तशी सज्जनांची मैत्री हळूहळू वाढतच जाते.
टीप- सुभाषितकाराने सज्जन व दुर्जनांच्या मेैत्रीचे खूप छान उदाहरण दिलंय. नुसतं सावलीचंच उदाहरण नाही तर मला वाटतं यातून अजून एक अर्थही निष्पन्न होऊ शकतो तो असा की,
दुर्जनांची मैत्री सुरुवातीला सकाळच्या वातावरणाप्रमाणे सुसह्य व पुढे उत्तरोत्तर तापदायक होत जाते आणि या उलट सज्जन सुरुवातीला भले कडक शिस्तीचे, कठोर भासत असतीलही परंतु जसजसे आपण त्यांच्या अधिकाधिक संपर्कात राहू तसतशी त्यांच्या मैत्रीतील प्रेम शीतलता आपल्या अनुभवास येते. दोघांच्याही मैत्रीला सावलीच म्हणायच तर सज्जनांची मैत्री आल्हाददायक तापनिवारक सावलीसारखी म्हणू तर दुर्जानांची मैत्री काळ्या सावटासारखी (संकटासारखी) म्हणावी लागेल.
सज्जनांच्या मैत्रीसंदर्भात एक श्लोक मागे माझ्या वाचनात आला होता. तो असा,
क्षोरग्रात्क्रमशः पर्वणि यथा रसः विशेषः।
तद्वत्सज्जनमैत्री विपरीतानां तु विपरीता।।
उसाच्या टोकाकडील (अग्रभागात) रस कमी असतो; पण आपण जसजसे पुढे पुढे चावत जातो, तसतसा अधिअधिक रस मिळत जातो सज्जनांची मैत्री देखील अशीच असते; मात्र याच्या अगदी विपरीत दुर्जनांची मैत्री असते.
हिंदी संतकवी रहीमदासाने आपल्या दोह्यांमध्ये दुर्जनांच्या मैत्रीचे परिणाम लिहिले आहेत. पाहूया,
रहिमन ओछे नरन सो, बैर भली ना प्रीत।
काटे चाटे स्वान के, दोउ भाँति विपरीत॥
हे रहीम, दुर्जनांशी मैत्रीही नको अन शत्रुत्वही नको तटस्थताच बरी कारण ज्याप्रकारे कुत्रा एक तर चावतो तरी किंवा चाटतो तरी पण दोन्हीही वाईटच होय.
रहीमदास पुढे म्हणतात,
ओछे को सतसंग, ‘रहिमन’ तजहु अंगार ज्यों।
तातो जारै अंग , सीरे पै कारो लगे॥
हे रहीम, चांगल्या माणसानं दुर्जनांची साथ सोडलेलीच बरी, ती निखार्यासारखीच होय. पेटता निखारा हातात घेतला तर पोळणे अटळ आहे आणि विझलेला निखारा (कोळसा) जवळ केला तरी ,त्याचा कलंक (काळा डाग) लागणारच.
कवी रहीमदासांनंतरच्या म्हणजे सतराव्या शतकात होऊन गेलेले कवी वृंद यांचेही दुर्जन मैत्रीवर दोहे आहेत,
ओछे नर की प्रीत की, दीनी रीत बताय।
जैसे छीलर ताल जल, घटत घटत घट जाय॥
वाईट लोकांची मैत्री हीन दर्जाची असते, ज्याप्रमाणे एखाद्या उथळ तलावाचे पाणी दिवसेंदिवस कमी होत जाते तशीच दुर्जनांची मैत्री देखील कमी होत जाते व शेवटी संपते.
बिनसत बार न लागई, ओछे नर की प्रीती।
अम्बर डम्बर सांझ के, अरु बारू की भीति॥
वृंदकवी अजून एका दोह्यात सांगतात की वाईट लोकांची मैत्री कामापुरती असते ती संपायला वेळ नाही लागत जसा दिवस संपत येतो तोच संध्याकळचे आकाश झाकोळून जाते तशीच यांचीही मैत्री असते.
अभिजीत काळे सर