आद्य शंकराचार्यविरचित प्रश्नोत्तरी - shankarachary prashnottar mala

आद्य शंकराचार्यविरचित प्रश्नोत्तरी - shankarachary prashnottar mala

 आद्य शंकराचार्यविरचित प्रश्नोत्तरी - shankarachary prashnottar mala

दिशंङ्कराचार्यकृत प्रश्नोत्तरमाला


अपारसंसारसमुद्रमध्ये संमज्जतो मे शरणं किमस्ति !

गुरो कृपालो कृपया वदैतद्विश्वेशपादाम्बुजदीर्घनौका !!

अर्थ..

प्रश्न : - हे कृपाळू गुरुदेवा! कृपा करून मला सांगा की या अपार संसार समुद्रात बुडणार्‍या मला कोणाचा आधार आहे?

उत्तर :- जगदीशाच्या.. विश्वनाथाच्या पदकमलरूप विस्तीर्ण नौकेचा!

चिंतन :- कृमिकीटकांपासून व्याघ्र सिंह हत्तीं सारख्या हिंस्र पशूंपर्यंतपर्वतनद्यावृक्षवल्ली पानं फुलंमनुष्य देव गंधर्व यक्ष किन्नर आणि अनंत अवकाशात पसरलेले असंख्य ग्रहगोल तारे नक्षत्रमंडळ इतकं सारं ब्रह्मांड जे दिसतं त्याला संसार म्हणतात...

    हा संसार अपार आहेअनादिअनंत आहे. त्याचा आरंभबिंदू वा अंत्यबिंदू कुणालाच दिसला नाही वा कळला समजला नाही. अशा या संसाराला संत सत्पुरुष ऋषि मुनि शास्त्री पंडित इत्यादींनी सागराचीनिबिड अरण्याची उपमा दिली आहे.

संसरति इति संसारः

    अशी संसाराची व्याख्या केली जाते. जो सततअखंडअविरत पुढे पुढे सरतो आहे तो संसारात. यात जे निर्माण होतं ते नष्ट होतं पुन्हा निर्माण होतं! प्राणी पशु वनस्पति जन्माला येतात मरतात पुन्हा जन्माला येतात! असं हे सृष्टिचक्र अखंड फिरतंय. या संसारात काही जड निर्जीव अचेतन काही चंचळ सजीव सचेतन काही अल्पप्रकट/ अप्रकट चेतन अशी खूप विविधता आहे.

    या सगळ्याचा विचार करण्याची शक्ति फक्त मनुष्यप्राण्याला आहे...त्याला या सर्व ब्रह्मांडाबद्दल,त्यातील प्रत्येक घटकाबद्दल जशी प्रचंड जिज्ञासा आहे तशीच स्वतःबद्दल सुद्धा आहे.

    मी कोण आहेकुठून आलोका आलोकशासाठी आलोइथून कुठे जाणार आहेकधी कसा केव्हा किति काळासाठी जाणार आहे अशा अनेक प्रकारची जिज्ञासा आहे. येणार्‍या सुखदुःखादि अनुभवांनीही तो  विचारप्रवण होतो.

    कितीही प्रचंड प्रमाणात सुख मिळालं तरी ते अत्यल्प वाटतं व कितीही कमी दुःख वाट्याला आलं तरी ते पर्वतप्राय प्रचंड वाटतं... आपल्या सारख्याच अन्य माणसांनाही सुखदुःख भोगायला लागतं व त्यात अकल्पनीय विविधताही आहे... या सार्‍याचं कारण काय असेल?.. या ब्रह्मांडाचा निर्माता,स्थितिपालक व संहारकर्ता एकच की अनेक?.. हे मुळात निर्माणच का झालंअशा अनेक प्रश्नांनी माणसाला भंडावून सोडलेलं असतं!

    माणसं जन्माला येतात,काही काळ जगतात व मरतात... देह तर भौतिकच दिसतो तर मग याला हलवणारा बोलवणारा विविध भावनांमधे बुडवणारा नाचवणारा कोण आहेत्याचं स्वरूप कायतो येतो कुठून व जातो कुठेअशाही अनेक प्रश्नांनी त्याची मति गुंग होते! या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता त्याला आतून निश्चित वाटत असतं की मला नाही तरी या सार्‍याचं पूर्ण व यथार्थ ज्ञान असणारा कुणी तरी असणारच!

        मी नाही तरी या अखिल ब्रह्मांडाचा जो कोणी कर्ताधर्तासंहर्ता असेल. या ब्रह्मांडाच्या उत्पत्ति स्थिति विनाशाला जो कुणी जबाबदार असेल त्याला जाणणारा नक्कीच कुणी असला पाहिजे! काळाची ज्या एका बिंदूपासून प्रवृत्ति झाली तिथपासून ते अत्ताच्या क्षणापर्यंत किति काळ लोटला असेलअजून किति काळ जायचा आहेहेही जाणणारा नक्कीच कुणीतरी असेल असंही त्याला वाटत असतं.

    अशा अशांततेतच विचारकल्पनांच्या आवर्तनातच.. त्या निर्मात्याच्या स्वरूपदर्शनाची तळमळ लागलेली असतानाच ज्या कुणाकुणाला याचं ज्ञान झालं तेच ऋषि मुनि गुरु ज्ञानी या संज्ञांनी ओळखले जाऊ लागले. ज्यांची ती जिज्ञासा शमली नाही ते अज्ञानी सामान्य ठरले व ज्यांना ही जिज्ञासाच नाहीनव्हतीफक्त आलेलं मिळालेलं जीवन जगणं व मरणं एवढंच जमलं ते मूढ ठरले.

    यातल्या अस्वस्थ जिज्ञासूंचं प्रतिनिधित्व स्वतःच्या ठिकाणी कल्पून गुरूंना विचारलेले प्रश्न आणि गुरूंनी दिलेली उत्तरं आद्य शंकराचार्यांनी लिहिलेल्या प्रश्नोत्तरी या छोट्याशा प्रकरणग्रंथात दिलेली आहेतत्यातला हा पहिला प्रश्न आहे..

    ग्रंथ निर्विघ्नपणे लिहिला जावा या हेतूनं आचार्यांनी ईश्वरस्मरणानं या ग्रंथाची सुरवात केली असून उत्तरात "विश्वेशपादाम्बुजा" चा उल्लेख केला आहे. श्रीमद्भागवताच्या माहात्म्यातही संसाराला सागराची उपमा दिल्याचं आढळतं...

संसारसागरे मग्नं दीनं मां करुणानिधे

कर्ममोहगृहीतांगं मामुद्धर भवार्णवात् ।।..

भगवंताकडे प्रार्थना करताना असं म्हटलंय.

    सागर म्हटला की त्यात लाटाभोवरेलहान मोठे मत्स्य कच्छपादि  जलचर असणारच... समुद्रात गटांगळ्या खाणार्‍यांना त्यांच्यापासून प्राणभयही असणार त्याचप्रमाणे या संसारातही हे सर्व आहे! स्वतःच्या कर्तृत्वानं.. प्रयत्नानं जेव्हा स्वतःला वाचवता येत नाही अशी खात्री पटते तेव्हा अन्यांची मदत घेतली जाते..

    मदत करणारा समर्थनिःस्वार्थी असावा अशीही अपेक्षा असते व तशा विश्वासानंच त्याच्याकडे जावं लागतं. असा सर्वसमर्थ व संशयातीत विश्वासार्ह ईश्वर व गुरू वाचून कोणीही असू शकत नाही.. मार्ग दाखवणारा व तारणारा गुरु असला तरी तो स्वतःकडे कर्तृत्व घेत नाही व ईश्वराकडेच जाण्यासाठी प्रश्नकर्त्याला प्रेरित करतो!

सागराला भरतीओहोटी असते पण संसारसागराला फक्त भरतीच असते...

बोधले बुवा म्हणतात.. संसारसागर सागर भरला जातो पूर। या संसारसागरात उठणार्‍या लाटा विषयांच्याच असतात.. लाटा उसळती विषयांच्या बहुत प्रपंच्याच्या.. हे विषय माणसाला इतकं जखडून ठेवतात की प्रपंच्याच्या जन्ममरणरूप भोवर्‍यात तो गरागरा फिरत राहतो! प्रपंच भोवरा फिरतसे गरगरा!

विशेषेण सिनोति नाम बध्नातीति विषयः।

विशेषप्रकारे बांधून ठेवतो म्हणून त्याला विषय म्हणतात.

विषयांचे सुख द्वाड येथे आहे बहु गोड ।

पुढे आहे अवघड यमयातना बा!

असा संत तुकाराम सावधानीचा इषाराही देतात... पण माणूस त्या भोवर्‍यातच फिरत राहतो..त्यातून बाहेर पडायचं तर बोधलेमहाराज म्हणतात

सांगड बांधा रे भक्तीची यदुनाथनामाची

नरहरी बोधला हरिनामी रंगला!

ही भक्तीची सांगड म्हणजेच आचार्य म्हणतात ती विश्वेशपादांबुजदीर्घनौका! त्या नौकेत बसलं की ती सहज अपार संसार सागराच्या पार घेऊन जाईल... ज्यानं हा संसारसागर निर्माण केला त्याच्या जवळ... नव्हे त्याच्या आत घेऊन जाईल.. ती नौका मिळावी यासाठी मात्र गुरूचीच कास धरावी लागेल.. विषयभजन सोडून गुरुभजनी रमावं लागेल!

संत रामदासही म्हणतात

विषयवीष पिउनि बळे फुकट का मरावे? ..म्हणून.. हृदयी धरावे श्रीगुरुचे चरणकंज।

गुरुचरणी शरण जाऊन विनम्रपणे प्रश्न विचारला की ते सांगतील विश्वेशपादांबुजदीर्घनौका पकड.

महता पुण्यपण्येन क्रीतेयं कायनौस्त्वया 

पारं दुःखोदधेर्गन्तुं तर यावन्न भिद्यते।।

        पुण्यरूपी पुष्कळ धन खर्चून ही देहरूपी नौका घेतलीस नाआता तिचा योग्य वापर कर...  विषयभोगातिरेकानं ती फुटण्या आधीच या दुःखपूर्ण संसारसागराच्या पार पलिकडे जा.. त्यासाठी ही देहरुपीनौका त्या विश्वेशपादांबुजनौकेतच ठेव"... ठेव! म्हणजेच हा देह विश्वेशाच्या चरणकमलातच रत राहावा.. तिथेच विलीन व्हावा!

        त्यांचा असाही अभिप्राय मानायला हरकत नाही की विश्वेशपादांबुज ही दीर्घ.. विस्तीर्ण नौका असली तरी देहरूपी नौका इच्छा आकांक्षा वासनादींनी भरल्यामुळेराग द्वेषईर्ष्या क्रोधांनी भरल्यामुळे इतकी फुगलेली असेल की ती केव्हाही फुटू शकेल मग त्यावेळी त्यात ही विश्वेशपादांबुजरूपी नौका सज्ज ठेवली तर ती  एखाद्या जीवननौकेसाठी उपयोगी पडून जीवाला संसार सागराच्या पार नेऊन सोडील!"

 ----

बद्धो हि कोयो विषयानुरागी 

का वा विमुक्तिःविषये विरक्तिः! ।।

को वाऽस्ति घोरो नरकःस्वदेहः 

तृष्णाक्षयः स्वर्गपदं किमस्ति? ।।

सुभाषित मराठी अर्थ :-

प्रश्न :- खरा बद्ध कोण?

उत्तर :- जो विषयांमधे आसक्त आहे तो!

प्रश्न :- खरी मुक्ति कोणतीकशात आहे?

उत्तर :- विषयांमधे विरक्ति अनासक्ति असण्यात!

प्रश्न :- भयंकर नरक कोठे आहे?

उत्तर :- आपल्या(च) शरीरात(च)

प्रश्न :- स्वर्गपद..स्वर्ग कुठे आहेस्वर्गप्राप्ति म्हणजे काय?

उत्तर :- तृष्णा(क्षुधाही!)नाश होणं..वखवख संपणं!

चिंतन :-

        मनात जिज्ञासायुक्त प्रश्न निर्माण होणं... कुतुहल निर्माण होणं... आपल्याला काहीच कळत नाही हे कळणं ही ज्ञानप्राप्तीची पहिली पायरी.. पूर्वावस्था.. पूर्वअट! ज्याला असं वाटतं की आपल्यालाच सर्वच कळतंच त्याला काहीच प्रश्न पडत नाहीत.पण काहींना आतून असं वाटतं की

"कालो ह्ययं निरवधिर्विपुलाच पृथ्वी ।"

या न्यायानं काळाच्यापृथ्वीच्यासागरांच्याअवकाशाच्या पोटात बरंच काही आहे व आपल्याला ज्ञात असलेल्या विश्वापेक्षा अज्ञात विश्व अनंत पटींनी मोठं.. विशाल आहे.. पण माणसाच्या आयुष्यकाळाला मर्यादा आहेत.. चराचर विश्वाला जाणून घेण्याची इंद्रियादि साधनं खूप मर्यादित.. तोकडी आहेत!

        बुद्धीविचारांची झेपही फार उंच जाऊ शकत नाही! सर्वच्या सर्व यथार्थतेनं.. जसं जितकं जिथं जेवढं जेव्हाकेव्हा आहे ते साकल्यानं कळून घेणंसमजणं हे आवाक्या बाहेरचं असलं तरी जिज्ञासाज्ञानाची हाव अमर्याद व अस्वस्थ करणारी असल्यानं कुणा ज्ञान्याला गाठून सादर नमस्कार करून नम्रपणे विचारावं म्हणून ते आचार्यांना विचारू लागले.

        शंकराचार्यांनी प्रथमतःच स्वतःला असलेल्या ज्ञानाचं प्रमाण दाखवलं. समोरच्या अफाट आक्षितिज पसरलेल्या समुद्रात हातींचा दंड बुडवून बाहेर काढला व त्याच्या खालच्या टोकाशी लोंबकळणार्‍या जलबिंदूकडे निर्देश करून म्हणाले. विस्तीर्ण सागरातील पाण्याचा एक लहानसा थेंब जो या दंडाला चिकटून आलेला दिसतोय नाइतकंच माझं ज्ञान आहे!

        असे विनम्र व वास्तवाचं ज्ञानभान असलेले आचार्य प्रश्नाचं उत्तर देत आहेत.. बद्ध तेच ज्यांची बुद्धि विविध विषयांमधे अडकली आहे. त्यांचे भोग घेण्याच्या साधनांची जुळवाजुळव करण्यातच अडकली आहे व विषयांकडून दुःखाच्या लाथा खाऊनही तिथून जे परावृत्त होत नाहीत... होऊ शकत नाहीत!

    विषयांच्या उपलब्धतेला मर्यादा.. ते विषय उपभोगणार्‍या इंद्रियांच्या सामर्थ्याला मर्यादा.. विषयभोगाच्या कालाला मर्यादा.. विषयभोग घेणार्‍यादेहाच्या अस्तित्वाला मर्यादा इतकं सगळं असताना व हे कळूनही त्यात गुंतून राहण्याचं प्रयोजनच ज्यांना कळत नाही ते बद्ध!

        वास्तविकतः विषय हे जड असल्यानं ते सुख देऊच शकत नाहीत.. ते सुख देतात हा जीवाला होणारा भ्रम असून त्यालाच तो सत्य मानून व्यवहार करतो! भोक्ता जीव हा चेतनरूप सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याचाच अंश असल्यानं अंशीचे सर्वगुण त्याच्या ठिकाणी आहेतच.. त्या गुणांच्या प्रभावामुळे विषय सुख देतात असा आभास त्याला होतो व तो विषयांमधे अधिकाधिक गुंतत जातो व स्वरूपाची ओळख व स्वरूपाशी एकरूपता हे साध्य.. ध्येय बाजूला पडतं!

        पण विषयांपासून मिळणार्‍या सुखाचं खरं स्वरूप पाहिल्यावर आपलं ईप्सित.. ध्येय लक्षात ठेवून जो विषयांना योग्य वेळी योग्य अंतरावर ठेवतो.. त्यांच्या मोहात अडकत नाही तो विरक्त असं आचार्य सांगतात.

ये हि संस्पर्शजाः भोगाः दुःखयोनय एव ते ।

आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः।। भग.गीता.

जो विचार करील त्याला निश्चित कळून येईल की इंद्रियं व त्यांचे विषय यांचा जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंतच विषयांपासूनचं तथाकथित सुख मिळतं... पण कोणत्याही कारणानं त्यासंबंधात खंड पडला की दुःखाला सुरवात होते... अतिरेकी सुखही दुःखदच असतं व कमी सुखही दुःखालाच कारणीभूत होतं... एकाला एके काळी वा वेळी जो विषय सुखद वाटेल तोच दुसर्‍याला त्याच काळी वा वेळी दुःखदही ठरेल...शिवाय ज्या एका क्षणी जो विषय ज्याला सुखद वाटेल त्यालाच तो विषय अन्य काळी दुःखद वाटू शकेल... शिवाय

    यत् सुखं साधनाधीनं तद्दुःखमिति गद्यते या न्यायानं सुख जर साधनांवर अवलंबून असेल तर ती साधनं जोपर्यंत उपलब्ध आहेत वा सुख  देण्यास समर्थ आहेत तोपर्यंतच सुखाचा अनुभव येईल.. तेव्हा परिणामी दुःखात ढकलणार्‍या विषयांमधे न अडकणं.. त्यांची उपेक्षा करणं व जेवढ्यास तेवढाच उपभोग घेऊन अन्यथा त्यांच्याकडे उदासीनवृत्तीनं पाहणं हीच विरक्ति होय. जो शहाणा आहेसुबुद्ध आहेविवेकी आहे तो या विषयांमधे रमत नाही.. आसक्त होत नाही!

        ज्याच्या माध्यमातून सर्व विषय भोगायचे त्या देहाला मर्यादित भोगक्षमता मिळालेली असते.. विषयांची उपलब्धी कितीही असली तरी इंद्रियसामर्थ्य मर्यादित असल्यानं भोगाचा अतिरेक शरीरावर अनिष्ट परिणाम दाखवायला लागतो... अयोग्य भोग्यविषयभोगाची अयोग्य वेळ व तर्‍हा/पद्धति आणि इंद्रियांच्या भोगसामर्थ्याचा मर्यादातिक्रम या सर्वांचा एकत्रित परिणाम विविध व्याधिरूपानं देहावर व पर्यायतः आधिरूपानं मनावर उमटू लागतो व दुःखाला सुरवात होते... हाच नरक!

     देहाला जडणार्‍या व्याधीतून बाहेर पडण्यासाठी बायका मुलांना.. परिवाराला. अन्यांना सेवेसाठी वेठीला धरून त्यांच्याकडून होणारा विरोधदुर्लक्षउपेक्षाअपमानअसहकार हाही नरकच! ज्याची विषयतृष्णा संपली...

        अमुक एक विषय मनासारखाहवा तेव्हाहवा त्याप्रकारेहवा तितका वेळ मिळावा हा आग्रह ज्यावेळी सुटेल त्यावेळी तिथेच स्वर्गसुख अनुभवायला मिळेल... तृष्णेमधे क्षुधेचाही अंतर्भाव होतो... तृष्णा क्षुधा मावळल्या... हवं नको संपलं व ज्यावेळी जे यदृच्छेनं मिळेल त्याच्यात संतुष्ट समाधानी राहिलं की तोच स्वर्ग होय!

        मग तिथे लाचारीअपमानास्पद वागणूकभूतकाळात कमी मिळालेल्या सुखाबद्दलचा शोकवर्तमानकाली उपलब्ध असलेल्या सुखाबद्दलचा मोह व भविष्यात सुख मिळेल किंवा नाही ही चिंता व हातचं सुख कोणी हिरावून घेईल की काय ही भीति हे सर्व नष्ट होऊन केवळ आनंदाचा अनुभव मिळेल... तोच खरा स्वर्ग! शंकराचार्यांनी उत्तरादाखल उच्चारलेल्या सूत्ररूप शब्दांमधून हा आशय त्यांना अभिप्रेत असावा असं वाटतं!

टीप :- श्रीपाद केळकर साहेब कल्याण

संसारहृत्कः? श्रुतिजात्मबोधः ।

को मोक्षहेतुः? कथितः स एव ।।

द्वारं किमेकं नरकस्य? नारी ।

का स्वर्ग दा? प्राणभृतामहिंसा ।।

(आद्य शंकराचार्यविरचित प्रश्नोत्तरी)

अर्थ..

प्रश्न :- संसारातून  सुटण्याचा ..संसाराला जिंकण्याचं साधन कोणतं?

उत्तर :- श्रीमद्भगवत्‌ गीतेमधून होणारा आत्मबोध!

प्रश्न:- मोक्षाला कारणीभूत होणारं काय आहे?

उत्तर :- तेच..जे वर सांगितलंय ते! श्रीमद्भगवद्गीतेतले ज्ञान..आत्मबोध!

प्रश्न:- नरकाचं एकमेव असं दार कोणतं?

उत्तर :- स्त्री (पुरुषाची तिच्याबद्दलची वासना, कामना, अभिलाषा) /पुरुष(स्त्रीची त्याच्याबद्दलची वासना,कामाना,अभिलाषा)

प्रश्न :- स्वर्गप्राप्तिकारक अशी कोणती गोष्ट आहे?

उत्तर :- प्राणधारणा असलेल्या सर्व जीवमात्राबद्दलची अहिंसावृत्ति

चिंतन..

संसाराला जिंकणं.. त्याला हरवणं.. त्यातून सुटका मिळवणं याचाच अर्थ अनादि अनंत प्रवाहरूपात वाहात आलेला हा संसार व्यक्तिपुरता सान्त होणं.. संसारात पुन्हा यायला न लागणं.. जन्ममरणाच्या चक्राचं भेदन होऊन जिथून संसार प्रवृत्त झाला त्या मूळबिंदूशी.. आरंभ बिंदूशी.. परब्रह्म परमात्म्याशी एकरूप होणं.

तसं घडायला हवं असेल तर श्रुतींनी.. गीतेने तिथपर्यंत जाण्याचा जो मार्ग सांगितलाय त्यावरून चालणं... त्या परब्रह्माशी एकरूप होण्यासाठी ब्रम्हविद्येने गीतेने दिलेली साधना करणं. ते साधायला हवं असेल तर सांसारिक विषयांचा अंतस्त्याग करण्याची आवश्यकता आहे..सांसारिक विषयांची खरं, निर्भेळ सुख देण्यातली असमर्थता व ते सुख देतात हा निव्वळ भ्रम आहे हे ओळखून त्याविषयी उपेक्षा बाळगायला हवी व मन केवळ उपनिषद्वर्णित परब्रह्मरूपता साधण्याच्या साधनेत रहायला हवं.

        जसजशी साधना पुढे पुढे सरकेल तशीतशी संसारातली आसक्ति कमी होत जाईल व संसारातून पूर्ण अनासक्त होणं व परब्रह्माशी पूर्णपणे एकरूप होणं हाच मोक्ष! श्रुतिजबोध मोक्षाचं कारण(cause)आणि मोक्ष हे श्रुतिजबोधाचं प्रयोजन..हेतु(purpose).

        आचार्यांना विचारलेला पुढचा प्रश्न महत्त्वाचा असून त्यांनी दिलेलं उत्तर नाजुक आहे! ते नीट कळलं नाही तर त्यांच्यावर स्त्रीद्वेष्टेपणाचा, स्त्रीनिंदेचा, पुरुषी अहंकाराचा, पुरुषप्रधानसंस्कृतीचे पुरस्कर्ते असल्याचा आरोप करायला माणसं...तथाकथित विद्वान मागेपुढे पाहणार नाहीत. प्रश्न असा आहे की नरकाचं एकमेव दार कोणतं व आचार्यांनी दिलेलं उत्तर आहे "स्त्री" नरक ही विविध पातकांसाठी शिक्षा देण्याची जागा आहे. श्रीमद्भागवताच्या ५व्या स्कंधाच्या शेवटच्या दोन अध्यायात नरकांचं तपशीलवार वर्णन असून कोणत्या पापासाठी कोणता नरक मिळतो याचंही वर्णन आहे!

        माणसानं पुण्यकर्मच करावं. सच्चरित्र मानवाचं जीवन जगावं व मानवी जीवनाची अंतिमता म्हणजे देहात्मबुद्धिरहित. सुखदुःखांच्याही पार असलेली अपार आनंदाची स्थिति गाठावी म्हणजेच मोक्ष मिळवावा यासाठी जसं सकारात्मक मार्गदर्शन आहे तसंच पापप्रवृत्तीपासून लांब राहण्यासाठी नकारात्मक असं नरक वर्णनही दिलंय.

        गरुडपुराणातही प्रेतकल्प विभागात जीवनभर पापाचरण केलेल्यांची गति काय होते याचं वर्णन दिलंय जेणे करून गेलेल्या जीवाच्या मागे त्याच्या अन्य नातलगांना,परिचितांना उर्वरित जीवन कसं जगायला हवं याबद्दल मार्गदर्शन मिळेल.

पुरुषांमधे पापासाठी होणारी अधिकतर प्रवृत्ति ही स्त्रीमुळेच होते व स्त्रियांमधे होणारी पापप्रवृत्ति ही पुरुषांमुळेच होते.

        नारी शब्दात उपलक्षणेनं नराचाही समावेश आहे. माणसांच्या हातून घडणारी पापं ही स्त्रीपुरुषांमधील परस्परांबद्दलच्या आकर्षणामुळे. त्यातून निर्माण होणार्या देहसुखाच्या लालसेमुळे. ती लालसा पुरी होण्यासाठीच्या लटपटी, खटपटी मुळे. लालसा पूर्ण होण्यात कुणाचा अडसर आला तर त्याला बाजूला करण्याच्या कोणत्याही थरापर्यंत पोहोचण्याच्या ईर्ष्येनं अधिक घडतात. चोऱ्या, दरोडेखोरी, बलात्कार, आर्थिक भ्रष्टाचार, अनाचार याचं खरं मूळ स्त्री/पुरुषांच्या देहसौख्याच्या लालसेतच आहे! देहसुख अतिरेकी प्रमाणात घेतलं. अनिर्बंध स्वरूपात. विकृत रीतीत घेतलं तर देहाची नरकसदृश अवस्था व हवं ते सुख मिळालं नाही तर नैराश्यानं, हताशेनं, निर्बलतेनं, क्रोध मत्सर द्वेषादींनी मनाची नरकसदृश अवस्था!

        सनातन वैदिक धर्मात, भारतीय संस्कृतीत स्त्रीपुरुषांमधला कामाचार नियंत्रित रहावा म्हणूनच विवाह संस्कार सांगितला आहे. पतिपत्नींना विषयभोगासाथी मर्यादा व बंधन घालून दिली आहेत. देहसुखविषयक अनाचार अत्याचार विकृताचार हे पाप म्हणून गणले गेले असून त्या पापांबद्दल शिक्षा आहे. नरकवास आहे. पातिव्रत्य व एकपत्नीत्व हे समाजस्वास्थ्यासाठी व एकंदरीतच मानवीजीवन आरोग्यसंपन्न व सुव्यवस्थित राहण्यासाठी आवश्यक असून जीवनाचं अंतिम ध्येय जे ईश्वरप्राप्ति ते प्राप्त करण्याचं मुख्य जे देहसाधन ते नित्य सुविहित राहण्यासाठी अपरिहार्य. अनिवार्य आहे.

जगाच्या पाठीवरील कित्येक संस्कृति देहसुखविषयक अनाचारामुळे नष्ट झाल्याचं इतिहास सांगतो! म्हणून नरकाचं एकमेव द्वार पुरुषांसाठी स्त्री व स्त्रियांसाठी पुरुष हेच आहे. स्वर्ग कोण देतो. या प्रश्नाच्या उत्तरादाखल आचार्य सर्व प्राणधारकांबद्दलची अहिंसा सांगतात! दुसऱ्याला मारून. त्याचा जीव घेऊन आपलं पोट भरणं हे पशूंसाठी ठीक असलं तरी माणसांसाठी योग्य नव्हे! माणसं स्वदेहाबद्दल असलेल्या ममतेपोटी व उदरंभरणापेक्षा जिह्वालौल्यासाठी जेव्हा दुसऱ्याचा जीव घेतात तेव्हा ते पापच ठरतं व त्यासाठी विविध नरकांचं विधान केलं गेलंय!

        जीवो जीवस्य जीवनम् हा श्रीमद्भागवतात उल्लेखलेला विषय सिद्धान्त म्हणून घ्यायची आवश्यकता नसून एक सामान्य जीवनपद्धति. जीवनरीति म्हणून जाणण्याची गोष्ट आहे. संत ज्ञानेश्वर भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे असं विश्वात्मक देवाकडे पसायदान मागतात तेही भू स्वर्ग होण्यासाठी! पृथ्वीवर स्वर्ग अवतरण्यासाठी.

        यच्चयावत प्राणिमात्रांमधे प्राणधारकांमधे परस्परांविषयी प्रेम असेल. नैसर्गिक वैर, द्वेषभावना पूर्णतः नष्ट झाली असेल तर तिथे आनंदच नांदेल. भीतीपोटी माणसासकट सर्व प्राणी क्रूर बनतात.. जीवाच्या संरक्षणार्थ आक्रमक होतात वा आक्रमणाचा प्रतिकार करतात! भीति हे द्वैतभावनेचं अपत्य आहे... द्वितीयाद्वै भयं भवति!(श्रुति)... भयंद्वितीयाभिनिवेशतः स्यात् (भागवत स्कं. ११ अ. २ श्लोक ३७) पण सर्वत्र जर एकत्वाची भावना रुजली, दृढमूल झाली तर भीतीचा लवलेशही उरण्याचं कारण नाही.

       प्राणभृतां अहिंसा हे शान्तिकारक ठरेल. आनंदवर्धक ठरेल व पृथ्वीवरच स्वर्ग अवतरेल असं आचार्यांना म्हणायचं आहे. प्राणभृतां अहिंसा ही मनुष्य व मनुष्येतर प्राण्यांमधे जितकी आवश्यक आहे त्याहून अधिक माणूसप्राण्यांमधे आवश्यक आहे! मनुष्य जितका बुद्धीच्या बळावर अधिकाधिक प्रगत होत जातोय. विज्ञान व तंत्रज्ञान विकसित करून नवनवीन सुखसाधनं निर्माण करतोय. जग मुठीत सामावण्या इतकं जवळ आणतोय. परग्रहांवर वस्ती करण्याच्या शक्यता धुंडाळतोय तितका तो आत्मकेंद्रित, संकुचित, स्वार्थी व क्रूरही होत चाललाय. कुटुंबपरिवार, राजकीय, सामाजिक जीवन, राष्ट्राराष्ट्रांमधले संबंध,

        सत्तासंघर्ष, अनियंत्रित सुखाभिलाषा यामुळे कायिक, वाचिक, मानसिक अहिंसा वेगानं हरवत चाललाय व नानारूपा वसुंधरेवर स्वर्ग अवतरण्याऐवजी नरकच दाखल होतोय अवांछित व गैरसोयीच्या संततीला अनाथालयात व वृद्ध, विकलांग, रुग्णाईत अर्थार्जनाला अयोग्य अशा मातापित्यांना  वृद्धाश्रमात ढकलून क्रौर्याचं बीभत्स प्रदर्शन मांडतोय. ही प्राणभृतां अशस्त्रकृता हिंसाच आहे.

मग इथे स्वर्ग कसा अवतरणार? दुसऱ्यांबद्दलच्या कर्तव्याविषयी पराङ्मुखता हीही हिंसाच गणली जाईल. जर खरोखरच  स्वर्ग अवतरायला हवा असेल तर सर्व प्रकारची हिंसा टाळून परस्परसामंजस्य, परस्पर प्रेममैत्रीभाव यांचीच कास धरावी लागेल!

 

शेते सुखं कस्तु? समाधिनिष्ठो !

जागर्ति को? यः सदसद्विवेकी ।

के शत्रवः सन्ति? निजेन्द्रियाणि ।

तान्येव मित्राणि जितानि यानि ।

अर्थ :-

प्रश्न :- सुखाने कोण झोपतो?

उत्तर :- जो समाधीच्या अनुभवात रमतो तो!

प्रश्न :- जागा कोण असतो?

उत्तर :- ज्याच्या जवळ सत् व असत् चा विवेक आहे तो!

प्रश्न :- शत्रु कोण आहेत? (यातच न विचारलेला प्रश्न आहे की मित्र कोण हेत?)

उत्तर :- आपलीच स्वतःची इंद्रिये वरील कंसातील प्रश्नाचं उत्तर. तीच इंद्रियं जर जिंकली तर मित्र होतात.

चिंतन :- माणसाच्या आरोग्याचं मुख्य लक्षण त्याला योग्य वेळी योग्य प्रमाणात गाढ झोप लागणं हे आहे. पण अशी झोप लागायला त्याचं मन शांत हवं. मनात कोणताही त्रासदायक विचार येता कामा नये. असा झोप उडवणारा विचार न यावा या साठी आचार शुद्ध, पवित्र, निस्वार्थी हवा. नीतियुक्त आचरण व दुसऱ्यांच्या हिताच्या आड न येण्याची वृत्ती हवी !

        आहारही प्रमाणात हवा. अन्नपचनासाठी योग्य तो व्यायाम केला गेला पाहिजे! कोणत्याही कारणानं मन अशांत असेल तर गाढ शांत झोप लागणं शक्यच नाही. पण झोप उडवणारी काही कारणं जशी शारीरिक, मानसिक असतात तशीच पूर्वजन्मातली काही अज्ञातही असतात. कोणत्या क्षणी पूर्वकर्मांपैकी कोणतं? बरं वाईट, कर्मफल परिपक्व होऊन भोगासाठी समोर येईल कोणती? सुखददुःखद पूर्वस्मृति उद्बुद्ध होऊन मन अस्वस्थ होईल व सुखाच्या झोपेला माणूस पारखा होईल सांगता येत नाही.

        परन्तु भगवत्प्राप्तीसाठी काही नामसाधना. उपासना भक्ति जर काही किमान उंचीवर  पोहोचली असेल. जीवनातलं हवंनको संपलं असेल. आशा-निराशा-हताशांची आंदोलनं थांबली असतील. कामक्रोधादिक षड्रिपूंना जिंकलं असेल. मी देह नाही, जीवही नाही तर ते परब्रह्म आहे याची पुसटशी का होईना प्रचीति आली असेल तर त्या एकदा चाखलेल्या ब्रह्मसुखाच्या पुन्हा पुन्हा मिळवायच्या अनुभूतीसाठी जेव्हा समाधि लावली जाते. समाधि लागते तेव्हा तो अत्यंत सुखाची. स्वप्नविरहित झोप घेतो! तोच खरा भाग्यवान!

        पण ही सुखाची झोप मिळण्यासाठी माणसाला आधी अखंड जागं रहावं लागतं. म्हणजेच दक्ष सावध रहावं लागतं! ही दक्षता सावधानता द्रव्यदारा. जमीनजुमला वा अन्य काही क्षुद्र विषयोपभोग यांविषयीची नसून सत् काय व असत् काय याचं सतत परीक्षण करून विवेकानं सत् चीच कास धरून वागणं. पाऊल चुकूनही असत् च्या पक्षाच्या बाजूनं पडणार नाही या विषयींची अपेक्षित आहे ज्याला ऐहिकाच्या चिखलात रुतायची इच्छा नाही. ज्याला स्थल काल, व्यक्ति, परिस्थिति, निरपेक्ष, दुःखविरहित, इंद्रियातीत, निर्द्वंद्व, साधननिरपेक्ष सुखानंदाची अपेक्षा आहे. लालसा आहे. ते देऊ शकणार्या भगवंताच्या भेटीची तळमळ आहे. त्याला त्या मार्गावर पाऊल टाकताना हा सदसद्विवेक करणं. त्याच्या जोडीला आत्मानात्म, नीरक्षीर, चराचर, ग्राह्याग्राह्य इ. विवेक करणं अनिवार्य आहे.

        असा जो विवेकी एका क्षणापुरता नव्हे तर आमरण राहतो तोच खरा जागा. जागृत म्हणायला हवा. बाकीचे फसव्या इंद्रियसुखाच्या मागे लागून. त्या सुखांच्या भोगांनी येणार्‍या सुस्तीत वा सुखांनतर येणार्‍या दुःखांनी व्यथित होऊन ग्लानीत पडून राहतात. तो विवेक होण्याच्या प्रयत्नांमधे खोडा घालतात ती आपलीच इंद्रियं! त्यांची धाव सतत विषयांच्या मागे राहून जीवाची फरपट होते. अतिरेकी सुखोपभोग वा वाट्याला येणारे नित्याचे दुःखभोग यांमुळे इंद्रियं अकार्यक्षम बनतात व जेव्हा जीवाला विविध बंधनांच्या जाचातून सुटण्याची प्रामाणिक इच्छा होते. स्वरूपाविषयीची प्रामाणिक जिज्ञासा निर्माण होते. मी जीवही नसून त्या अखंड, पूर्ण, अद्वय, सच्चिदानंदस्वरूप परब्रह्माचा अंश आहे असा सिद्धांतवाक्यांनी बोध झाल्यावर आत्मप्रतितीची ओढ लागते तेव्हा एरव्ही विषयसुखाच्या लालसेनं बेभान होऊन ती इंद्रिये साथ देत नाहीत तेव्हा ती शत्रूच वाटतात.

        पण जर तीच इंद्रियं मनाच्या आधीन राहिली...बुद्धीच्या नियंत्रणात राहिली व सर्वांच्या पैल असलेल्या आत्मतत्त्वाच्या शोधासाठी राबू लागली तर मित्रही होतात. आहार-विहार, आचारउच्चार, विचारभावना यांच्या शुद्धीसाठी शारीर वाचिक मानसिक तप करायला त्या इंद्रियांचा सहयोग मिळाला तर ती मित्र बनतात!देहधारणे पुरतंच आवश्यक ते विषय भोगल्या नंतर ती इंद्रिये विषयांसाठी बाहेर न धावता मिळालेल्या भगवद्विषयप्राप्तीसाठी शांत निरिच्छ रहात असतील तर ती मित्रच ठरतात.

---

को वा दरिद्रो? हि विशालतृष्णः ।

श्रीमांश्च को? यस्य समस्ततोषः ।

जीवन्मृतः कः? तु निरुद्यमो यः ।

किं वाऽमृतं स्यात्? सुखदा निराशा ।।५।।

(आद्य शंकराचार्यविरचित प्रश्नोत्तरी)

अर्थ :- दरिद्री कोण? ज्याची तहान कधीच भागत नाही. अनिवार असते तो! श्रीमंत कोण? जो पूर्णतः संतुष्ट असतो. कोणत्याही परिस्थितीत संतुष्ट असतो तो! जिवंत असूनही मेलेल्यासारखा कोण राहतो? जो निरुद्योगी, आळशी, पुरुषार्थहीन आहे तो!

अमृत म्हणजे काय असेल?आशारहित सुखद मनस्थिति असणं, हताशा जीवनातून निघून जाणं हेच!

चिंतन :- आचार्यांना विचारलं गेलंय दरिद्री कोणाला म्हणावं? द्रव्यहीनाला? घरदारहीनाला? बायकापोरांचं लटांबर नसलेल्याला? काहीच न शिकलेल्याला? आचार्य या पैकी कोणालाच दरिद्री ठरवत नाहीत! माणसाला सतत काही हवं असणं.

काही नको हवं असणं. ही जी स्थिती आहे तिला दरिद्रता म्हणतात! हाव, अभिलाषा, हव्यास, हावरटपणा हे ज्याच्या मनात ठासून भरलंय तोच खरा दरिद्री! कोणताही विषय कितीही मिळाला वा मिळवला तरी आता पुरे! आता थांबू या!

असं न वाटणं हे दारिद्र्यच आहे!

        एके काळी एका खोली पाचशे रुपयात सुखानं होणारा संसार दैनंदिन गरजा, हौशीमौजी, पाहुणारावणा, आलागेला सर्व सांभाळत. आनंदात होत असे आणि आता पाच हजार, पन्नास हजार, पाचपन्नास लाख मिळाले तरी महिना अखेरीला जमाखर्चाचा ताळेबंद जमवण्यासाठी दुसऱ्यापुढे हात पसरावा वागणं हे दारिद्र्यच आहे! नवराबायको दोघेही कमावते असले तरी विषयांची, सुखसाधनांची अपेक्षा वाढणं. त्यांच्यातल्या विविधतेचं वेड लागून अनावश्यक खर्च वाढणं, चंगळवादाच्या, छानछोकीच्या, सामाजिक प्रतिष्ठेच्या नाना वेडांमुळे पैसा पुरा न पडणं हे दारिद्र्यच म्हणायला हवं!

        आपल्या सुखासाठी समोरच्याला आर्थिक, शारीरिक, मानसिक दृष्ट्या पिळणंछळणं व तरीही अपेक्षित सुख अपेक्षित प्रमाणात, वेळेत, स्थळी, व्यक्तीकडून मिळत नसल्याबद्दल चरफडणं, तडफडणं, अशांत राहणं, चिडचिड, रागवारागवी आक्रस्ताळेपणा करणं हे दारिद्र्याचंच प्रदर्शन करणारं ठरतं! माणसाची सगळी धडपड, प्रयत्न, खटपट, लटपट उणेपण अपूर्णता. न्यून घालवण्यासाठीच असते! जे जवळ नाही ते मिळवायला व जे नकोसं झालं ते घालवायला ज्याला सतत काही उद्योग करावा लागतो तोच दरिद्री श्रीमद्भागवतातही

       दरिद्रो यस्तु असंतुष्टः अशीच व्याख्या दिली आहे. पण याच्या उलट ज्याच्या इच्छा, आकांक्षा, कामना वासना पुऱ्या होवोत वा न होवोत. उरल्याच नाहीत, जीवनात काही मिळवायचं राहिलंच नाही असा पूर्णकाम. अवाप्तकाम. अकाम हा श्रीमंतच म्हणायला हवा. ज्याला लौकिक, पारलौकिक, आध्यात्मिक जीवनात परिपूर्णतेचा अनुभव आला, ज्याच्या जीवनात कसलीच अपूर्णता. कोणतंही न्यून, उणेपण औषधालाही शिल्लक रहात नाही तो खरा श्रीमंत!

आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्थो महारिपुः असं म्हणतात. आळसामुळं अकर्मण्यता येणं, निरुद्योगी, उद्यमहीन राहणं हे जिवंतपणी मरण जगणं आहे मृताला जसं लवकरात लवकर समाजस्वास्थ्यासाठी कोणत्या ना कोणत्या रीतीनं बाजूला करतात. दूर करतात तसं जो आळशी आहे,

        पुरुषार्थहीन आहे,निरुद्योगी आहे त्यालाही लोक टाळतात...आपला सोन्यासारखा किंमती वेळ फुकट जाऊ नये म्हणून! हे त्या आळशाचं जिवंतपणी मरण भोगणंच असतं! काहीही मिळवायचं वा घालवायचं नसलं तरी माणसानं निरुद्देशच सतत उद्योगी रहायला हवं. त्यातूनच आपोआप, अभावितपणे, निर्हेतुकपणे इतरांना काम, शिक्षण, उपचार, सोयी, सवलती, सुविधा मिळून समाजोत्कर्ष सहज साधला जाईल.

शेवटी विचारलंय जीवनमहासागराचं मंथन करून जे अमृत मिळवायचं त्याचं नेमकं स्वरूप काय?

आचार्य सांगतात आशारहित राहणं. हताशारहित राहणं ही जी सुखद, संतुष्टियुक्त, समाधानी स्थिति आहे तेच खरं अमृत! अपूर्णतेतून पूर्णतेकडच्या प्रवासात हेवेदावे, द्वेष मत्सर, काम क्रोध, राग लोभ, मदोन्मत्तता इ अनेक प्रकारची हालाहल विषं निघतात.

काही शीघ्र परिणामी असतात काही दीर्घ परिणामी असतात. काही जीवनातून एकदमच पार उठवणारी असतात तर काही मंदगतीनं परिणाम करत व न मारता मृत्यूचा अनुभव देणारी असतात.

या सर्व विषांना ज्ञानानं, विचारानं, विवेकानं दूर करत किंवा उपेक्षेनं मारत किंवा स्वतःच्याच ठिकाणी वैराग्याचा आधार घेऊन पचवत रहावं लागतं. ते हालाहल डोक्यात, मेंदूत, विचारात न शिरू देता स्वकर्तव्य निष्ठेनं करून आशाहताशांच्या आंदोलनांवर मनाला झुलू न ठेवणं व स्वतःची समाधानी शांत आनंदी वृत्ती नित्य ठेवणं हेच अमृत आहे. स्वतःसाठी व आपल्या संपर्कात येणार्या सर्वांसाठी!

श्रीपादजी केळकर

 

पाशो हि को? यो ममताभिमानः!

सम्मोहयत्येव सुरेव का? स्त्री!

को वा महान्धो? मदनातुरो यः!

मृत्युश्च को वाऽपयशः स्वकीयम् !।।६।।

(आद्य शंकराचार्यविरचित प्रश्नोत्तरी..६)

अर्थ..

प्रश्न :- पाश/बंधक कोणते?

उत्तर :- ममता आणि अभिमान!

प्रश्न :- दारू सारखंच मोहित करणारं कोण?

उत्तर :- स्त्री!(पुरुषाला) (स्त्रीला पुरुष!)

प्रश्न :- पूर्ण/ठार आंधळा कोण?

उत्तर :- कामान्ध!

प्रश्न :- मृत्यु कोणता?

उत्तर :- स्वतःचं अपयश/अपकीर्ति, बदनामी

चिंतन -

माणसाला खरी ओढ. आवड जर कसली असेल तर ती स्वतंत्र राहण्याची... जगण्याची! त्याला बोलण्याचं, अभिव्यक्तीचं, हिंडण्याचं इ.. सर्व प्रकारचं स्वातंत्र्य हवं असतं. आजची राज्यघटनाही माणसाच्या मूलभूत अधिकारांमधे सप्तस्वातंत्र्याचा समावेश करते. ते स्वातंत्र्य माणूस भोगतोही! तरीही तो एक प्रकारे परतंत्रच असतो! हातपाय तोंड मोकळं असलं तरी सारे वेळा हे स्वातंत्र्य उपभोगता येत नाही. कारण त्याला त्याच्याच ठिकाणच्या अभिमानाचे व ममत्वाचे पाश बांधून. आवळून ठेवतात. रूपाचा, वयाचा, शिक्षणाचा, सत्तेचा, पैशाचा इ.. नाना प्रकारचे अभिमान त्याला काही वेळा जागीच खिळून राहण्याचे वा आधीच्या जागेवरून दूर जाण्याचे वा अधिक जवळ जाण्याचे बंधन घालतात.

मनातलं बोलू देत नाहीत किंवा नको ते बोलायला लावतात. गप्पही बसवतात व कधी बोलायलाही भाग पाडतात. वस्तुपदार्थव्यक्ति इ बद्दलचं ममत्व सुद्धा असंच माणसाला बंधनात टाकतं! नेहमीच्या वापरातल्या किरकोळ वस्तुपदार्थांबद्दलचं ममत्व इतकं असतं की नुसती त्यांची जागा हलवली. बदलली तरी अस्वस्थता येते. आईवडिल बायकोमुलं भावंड आपल्याला कमी वेळ देतात व इतरांमधे अधिक रमतात यामुळं आपल्या स्वामित्व अधिकारावर जणु कुणी आक्रमण करतंय असं वाटून बेचैन व्हायला होतं!

        मुलीच्या सासरच्यांना तिच्याबद्दलच्या ममत्वानं काही बोलायला जावं तर त्यांचा रोष ओढवतो. संबंध दुरावतात.. तिचा छळ होण्याची प्रतिक्रिया संभवते. सुनेच्या माहेरच्यांना काही सांगावं मुलाच्या ममतेपोटी.. तर तिचे कान अधिकच फुंकले जाण्याची शक्यता निर्माण होते व कायद्याचा ससेमिराही मागे लागू शकतो! आपल्यापेक्षा सर्व दृष्टीनं कनिष्ठ असलेली व्यक्ती मोठेपणाचा आव आणते...

अनधिकारानं काही शिकवायला जाते.. त्यावेळी त्या विषयातला आपला अधिकारनिष्ठ अभिमान जागा होऊन आपण बोलतो..

        पण ते समजण्याची इतरांची पात्रता नसल्यानं आपलं कुणीच ऐकत नाहीत, अभिमान दुखावतो व शेवटी समाजापासून आपण तुटतो. आपण वाईट त्याज्य ठरतो पण त्याचवेळी इतरांचे परस्परांशी मनमोकळे खेळीमेळीचे मधुर संबंध जुळतात. चालू राहतात! मुळात ममत्व व अभिमान हे मीपणातून जन्मणारे आहेत...

या लोकी धनवंत मी सुजन मी स्वानंद मी सिद्ध मी।

ज्ञाता मी नरनाथ मी विबुध मी सर्वज्ञ मी शूर मी

असं मी मी करताना...

मी मी हेचि कळे परंतु नकळे कोठील मी कोण मी ।

एकदा मीच काय तो महत्त्वाचा हे ठामपणे मनात रुतलं की माझं, मला, माझ्यामुळे इ इ सुरू होतं. माझेपण इतकं घट्ट प्रबळ होत जातं की कशाच्याही मोबदल्यात ते सोडायला माणूस तयार होत नाही. पण जर खऱ्या मी चा शोध लागला व मी कोण आहे हे कळलं तर आपोआप सर्वच बदलून जाईल...

        हे जर कळलं तर क्रमानंच हेही कळेल की इथे फक्त त्याचंच आहे, तोच व्यापलेला आहे, त्यानंच केलेलं व त्याच्यासाठीच हे सर्व आहे, मीही त्याचाच, त्याच्यामुळेच व त्याच्यातलाच असून अज्ञानवश मी त्याच्यापासून स्वतःला भिन्न समजतोय. मग ममत्वही गळून पडेल व सर्वार्थानं बंधनमुक्ति मिळेल. पण जो पर्यंत मीमाझं सक्रिय आहे तो पर्यंत अनेक प्रकारच्या दृश्य अदृश्य पाशांनी मी बांधलेलाच राहीन!

        माणसाची सदसद्विवेक बुद्धि बधिर करणारा पदार्थ म्हणजे दारू व व्यक्ति म्हणजे पुरुषाला स्त्री व स्त्रीला पुरुष! दारू पीनेवालों को सिर्फ बहाना चाहिये असं म्हणतात.

सुख पचवायला, दुःख विसरायला, आनंद साजरा करायला,मीलनविरह,कुठल्याही निमित्तानं माणसं दारू पितात...तरी त्यांचा "पिणे" याविषयी काही दंडक असतो.. मर्यादा बंधनं असतात. पण स्त्रीच्या नादी लागलेला वा पुरुषाच्या नादी लागलेली अशा या कामातुराणां न भयं न लज्जा! दारूमुळे बुद्धि बधिर होत असेल पण स्त्रीपुरुषांमधली ही कामवासना विवेकबुद्धि नष्टच करते. माणसांना मोहान्ध बनवते.. क्रूर करते. पर्यायतः व्यक्तिजीवन, कुटुंबजीवन, समाजजीवन अशांत अस्वस्थ करते!

        दारूच्या आत्यंतिक सेवनानं कदाचित शरीरहानि होईल. जगण्याच्या आसक्तीतून वैद्यकीय सल्ल्यामुळे ती सुटेलही! पण परस्परांच्या वंचनेतून, परस्परांच्या सुखाच्या आड येण्यातून, सुख देण्याच्या अक्षमतेतून माणसं प्रसंगी आत्महत्या खून इतक्या टोकापर्यंतही जातात किंवा मनोरुग्ण बनतात! अभिमानममत्व या घट्टपाशांमुळेच माणसं या महान मोहात फसतात आणि आंधळी होतात! ठार आंधळी होतात! जानामि धर्मं न च मे प्रवृत्तिःजानाम्यधर्मं न च मे निवृत्तिः। असं म्हणणाऱ्या दुर्योधनासारखी माणसांची गत होते.

        आत्मनाशाशिवाय अन्य मार्ग उरत नाही. लोभो मूलमनर्थानाम् असं जरी असलं तरी लोभ हे कामाचं मदनातुरतेचंच अपत्य आहे. काम क्रोध लोभ मोह मद हे माणसाला विवेकहीन बनवतात. आंधळा बनवतात व कामाग्नीत, क्रोधाग्नीत, मत्सराग्नीत ढकलून त्याला. त्याच्यातल्या मानवतेला जाळून टाकतात! यातूनच जे अपयश येतं. जी अपकीर्ति,दुष्कीर्ति माणसाच्या वाट्याला येते ती त्याच्या आधीच्या सर्व चांगल्या गोष्टी, सत्कर्म, सुजनता इ ला झाकोळून टाकते व 'संभावितस्य चाकीर्तिः मरणादतिरिच्यते' या भगवद्गीतेतील वचनाप्रमाणे व समाजजीवनातील न्यायानं पुढील काळात तो क्षणोक्षणी कणाकणानं जिवंतपणे मरण जगत असतो!

        मृत्यूनंतर देह एकदाच जाळला जातो पण अशा अपयशानं, अपकीर्तीनं मन प्रतिक्षण जळत राहतं व देह कणाकणानं त्या वेदनांनी झिजत जातो. कुजत जातो! माणसाला आत्मविस्मृतीही घडते आणि

 "स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति!"

अभिमानममतेतूनच स्त्रीमोह, मदनातुरता अशा दारुतुल्य गोष्टींमुळे चित्तात भ्रान्ति, भ्रान्तचित्तातून पापचर्या.. दुष्कर्मप्रवृत्ति, व पापाचरण घडून अंतिमतः दुर्गति प्राप्त होते... परमेश्वरप्राप्तीचा मार्ग खुंटतो. आत्मलाभ, आत्मस्मृति, ब्रह्मात्मैक्य इ.. असंभवनीय ठरून आनंदसाम्राज्याचा चक्रवर्ति सम्राट असलेला मनुष्यमात्राचा जीव दुःखसागरात गटांगळ्या खात खात बुडून जातो!


किं भूषणात् भूषणमस्ति? शीलम् !

तीर्थं परं किं? स्वमनः विशुद्धम् ।

किमत्र हेयं? कनकं च कान्ता !

श्राव्यं सदा किं? गुरुवेदवाक्यम् ।।८।।

(आद्य शंकराचार्यविरचित प्रश्नोत्तरी..क्र.८)

अर्थ..

प्रश्न :- सर्व भूषणांमधे श्रेष्ठ भूषण कोणतं? उत्तर :- शील!

प्रश्न :- सर्वश्रेष्ठ तीर्थ कोणतं? उत्तर :- स्वतःचं विशुद्ध अंतःकरण!

प्रश्न :- या जगात त्याज्य असं काय आहे? उत्तर :- सुवर्ण व स्त्री!

प्रश्न :- नित्य ऐकावं असं काय आहे? उत्तर :- गीता श्लोक गुरुवाक्य!

चिंतन..

      स्त्री असो वा पुरुष असो प्रत्येकाला आपण चारचौघात चांगलं सुंदर दिसावं आपली सर्वांवर  छाप पडावी. लोक आपल्या व्यक्तित्वानं प्रभावित व्हावेत. असं नेहमी वाटतं. त्यासाठी आपल्याला शोभून दिसणारे वा चित्रविचित्र तऱ्हे ऱ्हेचे रंगीबेरंगी कपडे वापरले जातात. अगोपांगी विविध मौल्यवान धातूंचे, रत्नांचे सौंदर्यपूर्ण व नाजुक नक्षीकाम केलेले दागिने, अलंकार धारण केले जातात. चेहऱ्यावर विविध रंगरोपणांचा वापर केला जातो.

पण इतकं सारं करूनही ती स्त्री वा तो पुरुष जर अनैतिक वर्तन करत असेल, अन्यायानं वागत असेल, भ्रष्टाचारातून अमाप पैसा मिळवत असेल, इतरांशी उद्धटपणानं. असभ्यपणानं वागत असेल, पापाचार करत असेल, इतरांच्या वयाचा.. पदप्रतिष्ठेचा. विद्वत्तातपाचरणाचा. विविध क्षेत्रातील सेवाकार्याचा कणभर व क्षणभरही विचार न करता, मान न राखता स्वतःच्याच अहंकारात गर्क असेल तर त्याच्या या बाह्य आवरणांची.. वस्त्रप्रावरणांची.. अलंकारादि सजावटीची किंमत शून्य आहे!

त्यापेक्षा तो स्वभावानं, वागण्यानं, बोलण्या चालण्यानं नम्र..

        सत्यवादी. प्रामाणिक. मर्यादशील. सेवातत्पर, मदतीला धावून जाणारा.. कष्टाळू.. निरलस असेल तर त्याची किंमत सर्वात जास्त असते! माणसाच्या शीलासमोर इतर सर्व गोष्टी तुच्छ आहेत. कस्पटासमान आहेत! म्हणूनच शीलं परं भूषणं असं सुवचन रूढ झालंय! वास्तविक राष्ट्राची जगात प्रतिष्ठा जर कशामुळे बनत,वाढत व टिकत असेल तर त्यातील शीलसंपन्न व्यक्तींमुळे.व्यक्तीची कुटुंबात,कुटुंबाची समाजात व समाजाची राष्ट्रात किंमत राहते ती शीलसंपन्नतेमुळे!

पैसा शिक्षण सौंदर्य वा अन्य गुण कमीअधिक प्रमाणात असले नसले तरी चालू शकेल पण शील हा गुण मात्र अपरिहार्यतः व अनिवार्यतः प्रत्येक व्यक्तीत असलाच पाहिजे!

        अशी शीलसंपन्न माणसंच राष्ट्राची अमूल्य ठेवा असतात.. तीर्थक्षेत्र असतात!

तशी अनेक तीर्थक्षेत्रं... भौगोलिक रूपातली.. पल्या देशात आहेत.. इतरत्रही विविध धार्मिक तीर्थक्षेत्र आहेत.. ज्यात स्नान केलं असता, त्या त्या तीर्थांचं प्राशन केलं असता मनुष्य पापमुक्त होतो, देहामनानं शुद्ध होतो, तीर्थक्षेत्री केलेल्या दानादि कर्मांमुळे पापनिवृत्ति होते, मनःशांति मिळते! अर्थात हा काहींचा अनुभव असेल, काहींच्या मनात उद्भवलेली आशा असेल, कुणास ती खुळचट कल्पनाही वाटेल, भोळसटपणा वाटेल किंवा कुणी तीर्थांची.. तीर्थयात्रांची मनसोक्त टिंगलटवाळीही करेल.     

        तीर्थ शब्दात मूळ धातू तॄ(दीर्घ ऋकारयुक्त)धातु आहे..

तीर्यते अनेन इति तीर्थम् ..

ज्यायोगे तरून जाता येतं ते तीर्थ! तीर्थ शब्दात धर्म काम व मोक्ष हे तीन पुरुषार्थ साधून देणारा असा प्रयोजनात्मक भाव आहे.

तरति पापादिकं यस्मात्... (अभावितपणे, निर्हेतुकपणे, चुकून घडलेल्या)

पापांच्या सागरातून तरून नेणारं ते तीर्थ.. असाही एक अर्थ तीर्थ शब्दाचा आहे!

काही तीर्थं.. तिथं नित्य वास्तव्यास असणाऱ्या संतसत्पुरुषांच्या, महात्म्यांच्या तपाचरणांमुळे, जपादि अनुष्ठानांमुळे.. पवित्र राहतात.

कथा भागवतस्यापि नित्यं भवति यद्गृहे तद्गृहं तीर्थरूपं

हि वसतां पापनाशनम् ।।

 

ज्या घरी... स्थळी नित्य श्रीमद्भागवताचा पाठ होतो, भागवती कथा सांगितली जाते तेही तीर्थच असून तिथं राहणाऱ्यांची पापं नष्ट करणारं आहे. काहीजण भगवत्प्राप्तीच्या साधनांमधली तरतमता दाखवताना मूर्तिपूजेला अधम ठरवतात व तीर्थयात्रा अधमाधम ठरवतात तर काही याच्या उलटही क्रम लावतात. अन्य क्षेत्रे कृतं पापं तीर्थक्षेत्रे विनश्यति.. असं जरी असलं तरी.. तीर्थक्षेत्रे कृतं पापं वज्रलेपो भविष्यति हेही तितकंच लक्षात ठेवण्यासारखं आहे!

        पण मुळात आचार्य भौतिक भौगोलिक तीर्थक्षेत्रांना.. तीर्थांना तुलनेनं कमीच महत्त्व देतात,कमी लेखतात असं त्यांच्या उत्तरावरून वाटतं. तीर्थयात्रा करून, तिथे भरघोस दानधर्म करून घरी परतल्यावर जर माणसाच्या चित्तवृत्तीत भगवंताच्या अधिक जवळ जाण्याच्या दृष्टीनं वा तीर्थक्षेत्रातली, इतरत्र वावरणारी गोरगरीब माणसं कोणत्या दर्जाचं जीवन जगतात, कसं आयुष्य कंठतात हे पाहून काहीच सुधारणा होत नसेल तर ती तीर्थयात्रा व्यर्थ होय... अशा आशयातून ते म्हणतात की स्वतःचं मन विशुद्ध असणं हेच सर्वात उत्तम.. श्रेष्ठ तीर्थ होय!

        स्वतःच्या मनातले पराकोटीला पोहोचलेले स्वार्थ,कामक्रोधादि षड्रिपु, कर्मफलाबद्दलची तीव्र आसक्ति, आपपरभाव, अहंकार, क्षुद्रवृत्ति इ मळ जर पूर्णतः निघून गेले व असं शुद्ध चित्त एकाग्र करून बसल्या जागीच जर भगवच्चिंतन, भगवन्नामस्मरणकीर्तन केलं तर ते विशुद्ध मनच खरं पवित्रतम, श्रेष्ठ तीर्थ बनून जाईल.

तीर्थीकुर्वंति तीर्थाणि... असं नारदांनी भक्तिसूत्रात जे म्हटलंय ते श्रेष्ठ भक्तांच्या विशुद्ध मनाच्या अनुषंगानंच! मन चंगा तो काठवदमें गंगा अशी एक म्हण आहे..संत रइदासांना त्याच्या जवळच्या लाकडी द्रोणातील पाण्यातच गंगामैयानं दर्शन दिलं ते वर सांगितलेलं विशुद्ध मन तिला जाणवलं म्हणूनच!

        जे पापच करीत नाहीत त्यांना तीर्थावर जायची गरजच नाही. पण तीर्थयात्रा न करताही, दानधर्म न करताही जर कुणाला सुखानंदानं जीवन जगायचं असलं तर दोन मोठे मोह टाकायला हवेत. कारण ते मनुष्याचं मन व्यापतात, दूषित करतात, नाशाला कारणीभूत होतात.. ते दूर ठेवायला हवेत.. टाळायला हवेत.. टाकायला हवेत. ते दोन त्याज्य मोह म्हणजे कनक.. पैसा, धन, संपत्ति  व कांता म्हणजे स्त्रीबद्दलचा देहसुखविषयक भोग!जगाच्या पाठीवर अशी कितीतरी उदाहरणं दिसतील ज्यात एरव्ही चांगली गणली गेलेली माणसं या दोन मोहांमुळे मातीमोल झाली!

        राष्ट्राराष्ट्रातली गुपितं हेरांच्या, नागरी अधिकार्यांच्या, लष्करी सेनाधिकार्यांच्या अतिरेकी स्त्रीमोहानं.. केवळ सुंदर स्त्रियांच्या सहवासाच्या आकर्षणानं.. चोरली गेलेली आहेत, ज्यामुळे एकमेकांवर युद्धात वा युद्धावाचूनही मात करता आली. कनकलक्ष्मीच्या लोभमोहापायी माणसं निष्ठूर, क्रूर, आंधळी झालेली दिसतात, निंदनीय ठरतात!

        सुखाची गाढ निद्रा व त्यातून निरोगी जीवन अपेक्षित असेल तर धनाबद्दलची, स्त्रीबद्दलची गळेकापू स्पर्धा, चुरस, अनैतिक.. भ्रष्ट मार्गांचा अवलंब हे सगळं टाकून द्यायला हवं. भगवंताच्या प्राप्तीच्या मार्गातले.. साधनेतले सुद्धा हेच दोन मोठे अडथळे आहेत, कनककांतेचा लोभ... त्यामुळे अशुद्ध होणारं चित्त.. अशुद्ध चित्तामुळे घडणारी पापं हे सगळं पूर्णतः टाळायचं असेल... स्वतःचं शील जपायचं असेल तर पूर्ण जीवनात दोनच गोष्टी आम्ही ऐकल्या पाहिजेत असं आचार्य सांगतात. गुरुवाक्य! गीता श्रुति हे भगवंतांनी निरूपण केलेले मनुष्यकर्तृक नाहीत. ते धर्माबद्दलचं. माणूस म्हणून जन्मलेल्या जीवाचं.  ऐहिक, पारलौकिक व आत्मिक कल्याणप्राप्तीसाठी कर्तव्य सांगतात...

        जीवनाचा अधिकाधिक भाग ईश्वरप्राप्ती व ईश्वरसेवा यासाठी वापरता यावा यासाठी काही व्यवस्था सांगतात.. जी अनुसरली असता पापनिवृत्तिपूर्वक, दुःखरहित जीवन जगून भगवन्मयता साधता येते... त्या वेदातील शब्द, वाक्यं ऐकावीत ... त्यांनाही भगवद्रूपाचं वर्णन कसं करता आलं नाही... ज्ञानराशि असलेले वेदही ब्रह्मरूपाचं वर्णन करताना कसे मौनावले हे जाणून घ्यावं व वेदांचं प्रतिपाद्य जे परब्रह्म.. त्याच्या प्राप्तीसाठीचे मार्ग अनुसरण्यासाठी गुरुवाक्यांची त्यांच्याच कृपेनं उकल करवून घेऊन.. त्यातील गूढार्थ जाणून.. गुरूपदिष्ट साधनामार्गावर चालत राहून त्यांना दिसलेला भगवंत बघावा.. त्याच्यावर आत्यंतिक, परमप्रेमस्वरूपा भक्तीचा अभिषेक करून तो जाणावा व जीवनातलं चरम साध्य हस्तगत करावं.. सच्चिदानंदस्वरूप व्हावं!

 

टीपा :- श्रीपादजी केळकर

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post