शुक्रनीतिनुसार मनुष्याने या ९ गोष्टी नेहमी गुप्त ठेवायच्या असतात :- 9 Things to keep secret

शुक्रनीतिनुसार मनुष्याने या ९ गोष्टी नेहमी गुप्त ठेवायच्या असतात :- 9 Things to keep secret

शुक्रनीतिनुसार मनुष्याने या ९ गोष्टी नेहमी गुप्त ठेवायच्या असतात :- 9 Things to keep secret

दैत्यगुरु शुक्राचार्य हे महान विद्वान असण्याबरोबरच एक महान नीतिशास्त्रज्ञ देखील होते.  त्यांनी सांगितलेल्या नीति - धोरणांचा आजच्या काळातही मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.  त्यापैकी एका नीति सुभाषितात शुक्राचार्यांनी अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत कोणालाही सांगू नयेत, पूर्ण लपवून ठेवल्या पाहिजेत.  आपल्या वैयक्तिक जीवनाशी निगडीत, संबंधित या गोष्टी इतर कोणाला कळल्या तर ते आपल्यासाठी हानिकारक ठरते.

संस्कृत श्लोक-

आयुर्वित्तं गृहच्छिद्रं मंत्र मैथुन भेषजम्।

दानमानापमानं च नवैतानि सुगोपयेत् ।।

1) मान:- अनेक लोकांना समाजात झालेला त्यांचा सन्मान आणि आदर बोलून दाखवण्याची सवय असते.  ही सवय कोणत्याही माणसासाठी चांगली नाही.  आदर आणि सन्मान दाखवला तर काही विरोधी लोकांच्या नजरेत त्या व्यक्तीबद्दल द्वेषाची भावना निर्माण होऊ शकते.  तसेच या सवयीमुळे जवळच्या लोकांपासून अंतर निर्माण होण्याची शक्यता असते. हा स्वतःला मोठा समजतो आम्हाला तुच्छ लेखतो म्हणून जवळचे लोकही नाराज होऊ शकतात. 

2) अपमान:- जर एखाद्या व्यक्तीला कधीही अपमानाला सामोरे जावे लागले तर त्याने ही गोष्ट सर्वांपासून गुप्त ठेवावी. हे इतरांना सांगणे केवळ आपल्यासाठी हानिकारकच ठरू शकते. कारण जेव्हा आपला अपमान झाला असे इतरांना कळते, तेव्हा ते आपल्याला आदर देणे थांबवतात आणि आपली खिल्ली उडवू लागतात. आणि आपण हसण्याचे पात्र बनू शकतो.

3) मंत्र:- परमेश्वराची कृपा प्राप्त व्हावी म्हणून अनेक लोक रोज देवपूजा करतात.  अशा वेळी आपण नाम जपत असलेला नाममंत्र कोणालाही सांगू नयेत.  कारण असे म्हणतात की जो व्यक्ती आपली पूजा आणि मंत्र गुप्त ठेवतो, त्याला त्याच्या पुण्य कर्मांचे फळ मिळते. आणि नाममंत्र अतिशय रहस्यमय ठेवावे. कारण ते सर्वांना प्रकट केल्यास परमेश्वराला खुप खंती येते. 

4) धन/पैसा:- धन, पैसा आपल्या आयुष्यात अनेक सुखसोयी आणतो, पण कधी कधी हा पैसा तुमच्यासाठी त्रासाचे कारणही बनू शकतो.  तुमच्या संपत्तीबद्दल जितके कमी लोकांना माहिती असेल तितके चांगले.  अन्यथा, लोकांना जर तुमच्या संपत्तीविषयी लोभ संचरला तर त्यांच्या पैशाच्या लालसेपोटी अनेक लोक तुमच्याशी ओळख वाढवून पुढे तुमचे नुकसान करू शकतात. आणि कट कारस्थाने करून संपत्ती हडप करू शकतात. 

5) आयु/वय :- माणसाने आपले वय सर्वांसमोर उघड करू नये, असे नेहमीच म्हटले जाते.  वय जितके जास्त गुप्त ठेवले जाते तितके चांगले मानले जाते.  तुमचे वय ओळखून तुमचे विरोधक ही गोष्ट वेळ आल्यावर तुमच्याविरुद्ध वापरू शकतात.

6) घरातील भांडणे :- अनेकांना घरात गृहदोष असल्याने त्रास होतो, त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्या आणि त्रासांना सामोरे जावे लागते. भांडणही होतात अशा परिस्थितीत, आपल्या घराशी संबंधित दोष इतर कोणाला सांगणे आपल्यासाठी नवीनच  संकट उभे करू शकते. म्हणून घरातले भांडण कुणालाही सांगू नये. 

 7) औषध :- औषध म्हणजे आपल्या प्रकृतीविषयी वैद्यकीय माहिती कुणालाही सांगू नये. डॉक्टर ही अशी व्यक्ती असते ज्याला आपल्याबद्दलच्या अनेक खाजगी गोष्टी देखील माहित असतात. अशा परिस्थितीत तुमचे शत्रू किंवा तुमचा मत्सर करणारे लोक डॉक्टरांच्या मदतीने तुम्हाला त्रास देऊ शकतात किंवा समाजात पेच निर्माण करू शकतात.  त्यामुळे, तुमच्या औषधाची किंवा डॉक्टरांची माहिती सर्वांपासून गुप्त ठेवणे चांगले.

8) आपल्या खासगी लैंगिक संबंधांविषयी इतरांना कधीच सांगू नये - पती-पत्नीमधील सर्वात गुप्त गोष्टींपैकी एक म्हणजे लैंगिक संबंध.  ते जितके अधिक गुप्त ठेवले जाईल तितके चांगले.  पती-पत्नीच्या वैयक्तिक गोष्टी तिसऱ्या व्यक्तीला कधीच सांगू नये तसं सांगितल्याने मोठा त्रास होऊ शकतो आणि कधीकधी आपली बदनामीही होऊ शकते.

 9) दान:- दान हे असे पुण्यपूर्ण कार्य आहे, जे गुप्त ठेवल्यासच त्याचे अदृष्ट फळ मिळते.  इतरांनी स्तुती करावी किर्ती व्हावी किंवा लोकांमध्ये आपले मोठेपण मिरवण्यासाठी, ऐश्वर्य दाखविण्यासाठी दानधर्म केल्याचा आव आणणाऱ्या व्यक्तीने केलेली सर्व पुण्यकर्मे नष्ट होतात.

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post