गुरुंची महिमा - guru mahima
महानुभाव पंथ ज्ञान सरिता Mahanubhavpanth dnyansarita
प्रापंचिक वा
पारमार्थिक बाबतीत ज्याच्याकडून जे काही शिकता येतं त्याला गुरु मानून
त्याच्याबद्दल नम्रता धारण करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जन्माला आल्यापासून
आई, वडिल, मोठी भावंडं, घरातील
वडिलधारी मंडळी, समाजातील उच्चशिक्षित, कर्तृत्ववान व्यक्ति, शाळा महाविद्यालयातील ज्ञानदान
करणारे शिक्षक प्राध्यापक सतत शिकवतच असतात. इतकंच कशाला, ज्याला
शिकण्याची इच्छा आहे त्याच्यासाठी रस्त्यावरचा हमाल, भिकारी,
दारी आलेला याचक, घरातली मोलकरीण, नोकर चाकर सुद्धा गुरु ठरू शकतात कारण ते सतत काही ना काही शिकवतच असतात.
परमार्थात, विविध
विद्या, कला, शास्त्र यातही केवळ आपलं
आपण शिकता येत नाही! त्या शिकण्याला काही मर्यादा राहतात. ज्यानं आपलं उभं आयुष्य
एखाद्या विषयात खर्ची केलेलं असतं त्याला त्यात जी सरावानं.. अभ्यासानं.. विचार चिंतनातून
सहजता आलेली असते ती आपलं आपण शिकून येत नाही. तेव्हा गुरूचं महत्त्व
त्रिकालाबाधित आहे हे निर्विवाद! कोणत्याही विषयात नैपुण्य, कौशल्य,
परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी गुरूची नितांत आवश्यकता असते.
Jack of all master of
nothing असं जरी व्हायचं असलं तरीही गुरु हवाच. परमार्थात तर गुरु
ही अत्यावश्यक बाब! प्राथमिक साधना जरी आपली आपण केली तरी ती एका विशिष्ट पायरीवर,
पातळीवर पोहोचली की तिथून पुढे जाण्यासाठी गुरु हवाच! कारण जेवढं
जेवढं उंचावर जावं तेवढं तिथून घसरण्याचा, खाली पडण्याचा
धोका सर्वात जास्त! अशावेळी सावरायला, मोहातून बाहेर काढायला,
साधनेमुळे सहज जमू शकणारा गोतावळा आवरून लक्ष्यावर चित्त एकाग्र
करायला लावणारा व शिकवणारा गुरूच एकटा असतो!
अशा गुरूबद्दल स्वतः
कितीही उंचीवर पोहोचलो तरी ते आपल्याहून खूप अधिक उंचावर आहेत हे ध्यानात घेऊन
स्वतःला विसरणं व गुरूंची श्रेष्ठता निःसंकोचपणे चारचौघात मुक्त मनानं मान्य करणं
हे ज्याला जमलं तो खरोखरच वंदनीय आहे. सच्छिष्यांची असंख्य उदाहरणं देता येतील
ज्यांनी आपलं आयुष्य गुरुचरणांवर समर्पित केलं! आज्ञा
गुरूणां हि अविचारणीया या न्यायानं जो आपल्या गुरूचा शब्द जराही खाली
पडू देत नाही तो वंदनीयच म्हटला पाहिजे! आपल्या गुरूंबद्दल जसा नितांत आदर हवा
तसाच तो इतरांच्याही गुरुंबद्दल असायला हवा हे तत्त्व जो जीवनात कसोशीनं पाळतो
तोही वंदनीयच म्हणायला पाहिजे!
गुरु महिमा एक यथार्थ दर्शन ! या संसारात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला गुरूची अत्यंत अवश्यकता आहे, प्रत्येक मुलाची, तथा मुलीची पहिली गुरू माता" आहे, घरातूनच बोलण्याचे चालण्याचे उत्तम संस्कार माताच" करीत असते, मग दुसरे गुरु शाळेतील गुरूजी आहे, कारण त्याला उदरपोषणाची "विद्या" शिकवित असतात, तिसरे "गुरु" जे जीवन कोणाला प्राप्त करण्यासाठी मिळालेले आहे, अशी आध्यात्म्याची जाणीव करून देणारे असतात, ते एक "गुरू" असतात.
काहीं लोक वयाच्या
काही अवस्था ओलांडल्या नंतर किंवा काहीना वयाच्या पूर्व अवस्थेतच त्यांच्या ठिकाणी
एक आध्यात्मिक ज्ञानाची जिज्ञासा निर्माण
होते. मग त्या जिज्ञासा पूर्तते साठी अध्यात्मिक गुरु करण्याची ओढ निर्माण होते. मानवी
जीवनात आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्याचा ओढा का निर्माण होऊ नाही? हा
आध्यात्मिक ज्ञानाचा ओढा या संसारातील प्रत्येक व्यक्तीला जरुर ओढ निर्माण झालीच पाहिजे. हे मात्र तितकेच खरे आहे, जो विवेकशील
मनुष्य आहे. त्याला शेवटी का होईना आपल्या जीवनाचे नेमक साध्य काय? या गोष्टींची जिज्ञासा निर्माण होणारच, मग ज्याला
अध्यात्म ज्ञान आत्मसात करायचे आहे. त्याला गुरुची आवश्यकता भासणारच आहे,
"गुरु" म्हणजे सर्वात मोठा" अनुभव असलेला, एवं प्रत्येक क्षेत्रातील जाणकारी प्राप्त केलेला! मग भौतिक जाणकारी असो की, अध्यात्मिक जाणकारी असो! असा अनुभव असलेला गुरू"! खऱ्या अर्थाने तो गुरु म्हणून शोभून दिसत असतो. जेथे दिव्यतात्वाची प्रचीती, तेथे कर मात्र जुळती! महानुभाव पंथातील कवी गुरुचा संदर्भ देतात. तो पुढीलप्रमाणे म्हणतात.
तया नमन माझे गरु पदा । जेणे दाखविले आंनदकंदा ।
तो उपकार न फिटे मज कदा । देवा परमानंदा तोची फेडी ।।
सकळ ब्रम्हविद्येचे ज्ञान । झाले जया गुरुचेन ।
तया साष्टांगी अभिवंदन । करीत असे ।। (ज्ञानप्रबोध)
असता श्रीगुरु प्रसन्न । होववे सहज देहदमन ।
मन स्थीरावूनी आचरण । करवे गीताशास्त्राचे ।।
भारतीय संस्कृतीमधे
गुरुला अनन्यसाधारण महत्व आहे. तसे पाहिले, तर गुरूच्या संदर्भात रामदासांनी
लिहिलेल्या दासबोध या ग्रंथांत बरेच वर्णन
पाहावयास मिळते. ते पुढिल प्रमाणे !
एक गुरु
एक मंत्रगुरु । एक यंत्रगुरु, एक तंत्रगुरु ।
एक
वस्दादगुरु एक राजगुरु । म्हणती भजनी ।।
एक
कुळगुरु एक मानिला गुरु । एक
विद्यागुरु एक कुविद्यागुरु ।
एक
मातागुरु येक पितागुरु । एक राजगुरु ।
एक
देव गुरु एक बोलिजे जगद्गुरु । सकळकळा ।
ऐसे हे
सतरा गुरु । याही वेगळे आणिक गुरु।
एक
तयांचा विचारु । सांगिजैल! ।।
एक
स्वप्नगुरु येक दीक्षागुरु । एक म्हणती प्रतिमागुरु।
एक
म्हणती स्वंयें गुरु । आपला आपण ।।७०।।
जे जे
यातीचा जो व्यापारु । ते ते त्याचे तितुके गुरु।
याचा
पाहातां विचारु, । उदंड आहे. ।।७१।।
असो ऐसे
उदंड गुरु। नाना मतांचा विचारु।
परि
जो मोक्षदाता सद्गुरु । तो वेगळाची असे ।।७२।।
तात्पर्य :- अशा नानाप्रकारच्या विद्या शिकविणारे गुरु आपल्याला असंख्य मिळतील पण भगवंतापर्यंत नेणारा, या संसारचक्रातून मुक्त होण्यासाठी अनन्य अव्यभिचारी निष्काम भक्तीचा मार्ग सांगणारा गुरु एखादाच असतो. आणि तसा गुरु मिळणे हे भाग्यच! नाहीतर विद्या शिकून झाले की शिष्य काय करतोय, चांगले करतो की वाईट करतो याकडे गुरुचे लक्षच नसते.
संस्कृत साहित्यात
देखिल गुरु संदर्भात काही उदाहरण पाहायला मिळतात.
स्वर्गो
धनं वा धान्यं वा विद्याः पुत्राः सुखानि च ।
गुरुवृत्यानुरोधेन
न किञ्चितsपि दुर्लभम् ।।
गुरुवृत्तीला
अनुसरुन आचरण करणाऱ्याला स्वर्ग म्हणजे समाधान, व विद्या पुत्र आणि सुख हे दुर्लभ नाही. ‘‘कबीर संसारिक जीवांना उपदेश
करत असतांना म्हणतात. जो मनुष्य गुरुला सामान्य प्राण्या
प्रमाणे समजतो. त्याच्या सारखा मुर्ख" या जगात अन्य कोणी नाही. तो डोळे असून,
अंधाळ्या सारखा आहे. तो जन्म मरणरुपी भवबंधनातून मुक्त होऊच शकत
नाही.
गुरु को
मानुष जानते, ते नर कहिऐ अंधा ।
होय दुःखी
संसार में, आगे जम की फन्द ।।
गुरु
महिमा गावात सदा मन राखो अतिमोद
सो भव फिर
आवै नही बैठे प्रभु की गोद ।।
जो गुरु विषयीचा आदर लोकांना सांगतो. आणि गुरुच्या आदेशाच प्रसन्नाता पूर्वक पालन करतो. अशा प्राण्याचा या भवरुपी संसारात पुन्हा जन्म होत नाही. त्याची ईश्वाराला प्राप्त करण्याकडे वाटचाल सुरु होते, या संसारात आपणाला असा गुरु मिळाला पाहिजे, जोआपणाला या संसारातील सर्वात श्रेष्ठ असलेली वस्तु!ती म्हणजे परमेश्वर त्याची ओळख करुन देणारा असला पाहिजे.
भौतिक क्षेत्रातील
ज्ञान देणारे त्यांना शिक्षक म्हणतात. पण परमेश्वर शास्राची जाणीव करुन देणारे, असे दिव्य
सद्गुरु तुरळकच पाहाण्याला मिळतात. त्यांचे जीवन देखिल अतिशय निस्पृही त्यागी
वृत्तीचे असते त्यांनाच खऱ्या अर्थाने गुरू ही उपाधी शोभत
असते. या संसारात खऱ्या अर्थाने ज्यांना गुरु म्हणून उल्लेख
करावा, ते म्हणजे परमेश्वर अवतार श्रीकृष्ण भगवंत! ज्यांनी अर्जुनाला गीता निरोपण केली. म्हणून त्यांना "कृष्णं वंदे जगद्गुरुम्!" असे म्हटले आहे. दुसरे "श्रीदत्तात्रेय
प्रभूंना" देखिल जगद्गुरु" म्हटले आहे.
गुरुच्या संदर्भात! यथार्थ
गुरुची ओळख करून देणारी लीळा! मराठीतला आद्य ग्रंथ लीळा
चरित्रात पाहाण्याला मिळते. ती लीळा पुढीलप्रमाणे! कलियुगातील परब्रम्ह परमेश्वर अवतार भगवान श्रीचक्रधर स्वामी यांचा मुक्काम पैठण येथे होता. तेथील
गुरुच्या संदर्भातील एक प्रसंग आहे. तो पुढील प्रमाणे ! देमाईसा हि पिंपळगावची
राहाणारी होती.ती पोथी पुराण ऐकण्या साठी जायची. एक दिवस पूराणा मधे तीने ऐकले. गुरु
केल्यावांचून या संसार बंधनातून एवं जन्म मरणाच्या रहाटगाडग्यातून हा जीव मुक्त
होत नाही.
मग तीने गुरु
करण्याचा पक्का विचार केला. मग ती कोणता गुरु करावा, या संदर्भात चौकशी करु लागली.
ती घरच्यांना व शेजारच्या वडिलधाऱ्यांना विचारु लागली. कोण
गुरु करावा? अशी ती शेजारच्यांना देखील विचार पूस करते. मग शेजारच्या लोकांनी काही
ठराविक नामांकित प्रसिद्ध असलेल्या गुरुंच्या नावाची यादीच तिला दिली. कारण
नामांकित एवं प्रसिद्ध गुरुंकडे सामाजाचा जास्त ओढा असतो. यादी दिली असतांना,
शेजारचे सर्व लोकांनी एका नावावर जास्तभर दिला. पैठण नगरीमधे असे एक
नामांकित गुरु आहे. त्यांचे नाव "वामदेवाचार्य" आहे. त्यांना तुम्ही
गुरु करा!
मग देमाईसा गुरु
करण्याला लागणारे सर्व पूजेचे साहित्य त्यामधे नारळ, पानसुपारी, फळ फुले घेवून, ती पैठणला आली. वामदेवाच्या गुंफेत
आली. मग ती वामदेवाला पहाते. तर ते मोठे जाडजूड, काळेकुट्ट,
त्यात नग्न! असे दृष्य तिने पाहिल्यावर, तीने
मनात जरा विचार केला. आपण जर असा गुरु केला तर धड त्याच्याजवळ आपल्याला बसता येणार
नाही. काही प्रश्न विचार पूस करता येणार नाही. मग देमाइसा
तसीच परत निघाली.
तेंव्हा तिला
लखूबाइसा भेटली. तिने देमाइसाला विचारले.तू कोठे गेली होती? देमाइसा
म्हणाली. मी गेले होते, गुरू करण्यासाठी, मग केला गुरु! तेंव्हा देमाइसाने सर्व वृतांत लखूबाइसाला सांगितला. मला
असा गुरु पाहिजे, तेथे गेल्यावर आपणाला त्यांच्या जवळ बसता
आले पाहिजे. शंका समाधान करुन घेता आले पाहिजे. तरी असे दुःखी जीवन जगण्यात काय
अर्थ! या संसार बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग सापडला पाहिजे. मग त्यासाठी योग्य
गुरुची निवड करायला नको का?
मग लखूइसा म्हणाली, ठिक आहे. ‘‘माझ्या संगाती चाल, मी तुला योग्य गुरु दाखवते.’’ मग ती देमाइसाला घेऊन, सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी ज्या मंदिरात उतरले होते. ते भोगनारायणाचे मंदिर होते, त्या मंदिरात लखूइसा देमाइसाला घेऊन आली. मग देमाईसाने स्वामींना पाहिले. आणि मनात म्हणाली, असे गुरु" पाहिजे. जेथे आपल्याला जीवन मुक्तीचा मार्ग विचारता येईल, शंका समाधान करुन घेता येईल, जसे स्वामींचे दर्शन झाले. तसे तिला मनशांती प्राप्त झाली. मग तिने नारळ पान सुपारी, फुले फळे स्वामींच्या समोर ठेवली व बाजूला जाऊन बसली. स्वामी तिला म्हणतात, ‘‘बाई असे समोर या! समोर बसा! याचकाने गुरु, देवता, राजा यांच्या समोर बसावे.
मग देमाइसा
भक्तीजणात येवून बसली. मग स्वामींनी तिला निरोपण केले. संसार बंधनातून मुक्त
होण्याचे यथार्थ ज्ञान व त्या ज्ञानाची ओळख करुन दिली. असे देमाइसाला साक्षात
परमेश्वररुपी गुरु मिळाला. तसेच सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे सान्निध्यही मिळाले.
म्हणून जीवाला यथार्थ ज्ञान करुन देणारे, व जीवाचा उद्धार करणारे, खऱ्या अर्थाने परमेश्वरच गुरु असतात. किंवा त्यांचे
भक्त असतात, ती गुरु परंपरा चालवीत असतात. अशी गुरुची महिमा
महान आहे. परमेश्वर ज्ञानाची, एवं आध्यात्माची परंपरा वाहाणाऱ्या गुरुजनांना कोटी कोटी दंडवत प्रणाम!
गुरु परमात्मा प्रकाशक ही सर्व गुरूंबद्दल धारणा होणं. गुरु देहात असताना वा देहातून गेल्यावरही त्याचं अविरत स्मरण ठेवत नित्याचा प्रत्येक व्यवहार सांभाळणं हे ज्याला साधलं तो खरा वंदनीय! स्वतःला गुरुत्व मिळूनही जो शिष्यत्व विद्यार्थित्व क्षणभरही न विसरता आपल्या गुरूचं महत्त्व वाढवतो तो खरा वंदनीय. पण हेही सज्जनसंगमातून व परगुणांबद्दल असलेल्या प्रीतीतून साधता येतं अशी ही साखळी आहे.