संस्कृत सुभाषित रसग्रहण - Sunskrit Subhashit
परगुणे प्रीतिः
चिंतन.. दुसर्यांच्या गुणांवर प्रीति,प्रेम असणं हे मनाच्या मोठेपणाचं लक्षण आहे! सामान्यतः दुसर्यांच्या गुणांमुळे मनात मत्सर द्वेष ईर्ष्या यांचाच प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते... क्वचित् प्रसंगी त्यांचं कमीजास्त प्रमाणात प्रकटीकरण झालेलंही अनुभवायला मिळत! अर्थात या गोष्टी स्वतःच्या ठिकाणी असलेला अहंकार वा कमीपणाची भावना.. न्यूनगंड (Inferiority Complex) यांचं अपत्य म्हणूनही पुढे येतात! दुसर्याचे गुण जाणायला आपणही काही अंशी गुणी असावं लागतं... गुणी गुणं वेत्ति न निर्गुणः। असं म्हटलंच आहे ना!
परगुणपरमाणून् पर्वतीकृत्य नित्यं
निज हृदि विकसन्तः सन्ति सन्त कियन्तः।
असं जेव्हा सुभाषितकार विचारतात तेव्हा त्याचं उत्तर "कोऽपि न" असंच गृहीत धरलेलं असतं!दुसर्याचा परमाणू एवढाही गुण पर्वतप्राय करून तिसर्याला कौतुकानं सांगणं यासाठी आपलं हृदय, चित्त, मन किति विशाल असलं पाहिजे ना? अशी विशाल मनाची..उदार मनाची माणसं हाताच्या बोटावरच मोजायला मिळतील इतक्या अल्पसंख्येत असतात हा सुभाषितकाराचा अभिप्राय लक्षात घेऊनच प्रस्तुतच्या सुभाषितात
"परगुणे प्रीतिः" असलेली माणसं वंदनीयच ठरतात! इथं गुण म्हणजे सद्गुण अपेक्षित आहेत... गृहीत धरलेले आहेत! विविध कला, विद्या, शास्त्रशिक्षण संपादूनही माणसं गुणी असतीलच असं नाही! नम्रता, रसिकता, हंसतमुखता, साहाय्यवृत्ति, सहजता, अकृत्रिमता, प्रसन्नता, ग्रहणशीलता, आकलनशीलता, प्रांजलता समंजसता, एकता, समानता, विश्वासार्हता, प्रामाणिकता इ. इ. कितीतरी गुण आहेत जे व्यक्तीचं जीवन उजळवून टाकतात...
परस्परसौहार्द निर्माण करू शकतात! यातले सगळेच सगळ्यांकडे असतील असं नाही. पण आपल्यात कोणते गुण नाहीत जे आपलं जीवन सुखी करायला उपयुक्त व अत्यावश्यक आहेत याची आत्मपरीक्षणान्ती आतल्या आत जाणीव झाली की मनुष्य निश्चित ते गुण संपादण्यासाठी प्रयत्न करील. सुभाषितकार म्हणतात दुसर्यांच्या गुणांवर प्रेम करणं... तेही निरपेक्ष... ही फार मोठी व दुर्लभ गोष्ट आहे. ती ज्यांच्याकडे आहे तेही खरंच वंदनीय आहेत. पर या शब्दाचा जसा परका,दुसरा असा अर्थ सामान्यतः घेतात तसा श्रेष्ठ, असाही अर्थ आहे. एखादा आपल्यापेक्षा श्रेष्ठ का ठरतो...कोणत्या गुणांमुळे श्रेष्ठ ठरतो याचा विचार करून त्या गुणांवर जर प्रेम केलं.. ते आत्मसात केले तर आपणही श्रेष्ठ व वंदनीय,आदरणीय ठरू शकू!
पहिल्या क्रमांकावरील वाञ्छा सज्जनसंगमे व दुसर्या क्रमांकावरील परगुणे प्रीतिः यांचाही परस्परावलंबी संबंध लक्षात घेतला तर कोणत्या गुणांमुळे सज्जनत्व प्राप्त होऊन इतरांना त्यांच्या संगतीची इच्छा होते याचा उलगडा होईल व सज्जनसंगतीत राहिल्यावर दुसर्यांच्या ठिकाणी असलेल्या गुणांवर प्रेम कसं करावं हेही कळेल. आणखी एक... पर हा शब्द परब्रह्म, भगवंत, परमेश्वर अशाही अर्थानं घेता येईल.परब्रह्म निर्गुण निराकार निरवयव एकमेवाद्वितीय, इ इ स्वरूपाचं असून सच्चिदानंदस्वरूप आहे असं जे वर्णन करतात त्यावर नितान्त प्रेम करता करता त्याच्या जवळ जात जात तद्रूपत्व साधणारे जे तेही वंदनीयच ठरतात. तो पर.. परमात्मा सगुण गृहीत धरून त्याचे जे षड्गुण सांगितले जातात.... ऐश्वर्य, वीर्य, यश, श्री, ज्ञान व वैराग्य ... असे... त्यातला एखादा जरी अंशतः का होईना जो आत्मसात करील... आयुष्यभर प्रेमानं जोपासील तोही वंदनीयच ठरतो!