आचार्य श्रीमुरारीमल्ल विद्वांस अन्वयीत शोधनीचा पाठ महानुभावांचा-इतिहास-Mahanubhav-panth-history shodhani pathha

आचार्य श्रीमुरारीमल्ल विद्वांस अन्वयीत शोधनीचा पाठ महानुभावांचा-इतिहास-Mahanubhav-panth-history shodhani pathha

 आचार्य श्रीमुरारीमल्ल विद्वांस अन्वयीत शोधनीचा पाठ

महानुभावांचा शास्त्र इतिहास 

  पुर्व पिठीका

पूर्ण परब्रम्ह परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी उत्तरापंथी प्रयानानंतर आचार्य श्रीनागदेवांसह सर्व भक्तमंडळी ऋद्धिपूर येथे असतांना वाजेश्वरी येथे विजनाला जात अस त्यावेळी विद्वतरत्न श्री माहींभटांनी श्री नागदेवाचार्यांना विचारले, भटो तुम्ही  मननावेगळे दिसतच नाही. तुम्ही काय मनन करीत असता? त्यावर भटोबास म्हणतात मी गोसाव्यांच्या ठाई अनुसरलो त्या दिवसापासुनच्या लिळा मनन करीत असो मग माहींभट्टी म्हणितले या पूढा गोसाव्यांचा मार्ग चालावा ऐसा हेत असे तर त्या परिवाराने काही मनन करावे? त्यासाठी मी गोसाव्यांच्या लिळेची शोधनी करू? 

भटोबासांनी म्हटले, करा परंतु जयाच्या अनुभवीच्या ते तयाते पूस पूसो करा! आणि माते दाखवा मग बंदी टाचा अश्या प्रकारे माहींभट्टांनी स्वामींच्या प्रयत्नानंतर अल्प आवधीतच प्रथम शोधनी केली. पूढे दुसरे परब्रम्ह परमेश्वर अवतार श्रीप्रभू बाबा निजधामाला गेल्यानंतर श्रीभट्टोबासांसह मार्ग गंगातीरी आलो त्याकाळात पंडीत श्रीकेशोबासादि अनेक विद्वान शिष्य जोडीले. त्यात केशो पंडीतांची विद्वत्ता पाहून श्री भटोबासानी तयासी ते लीळेचे खरडे पाहावयासी दिधले तव केशोबासी म्हणीतले भंटो मी शास्त्रान्वय लावु? भट्टी मानीतले पर माते पुसपूसो लावा. मग केशिराज पंडितांनी लीळाचरित्रातून सूत्रे निवडून काढलो. व श्री आचार्यांना विचारून त्या सूत्राचा क्रम लावला. व ज्या प्रकरणाची सूत्रे त्या प्रकरणात घातली. 

अशा प्रकारे सर्व प्रकरण तयार केले. पूर्वी पंचकृष्ण, पंचनाम ११ अन्य व्यावृत्ति सूत्रे १०, युगधर्मसूत्रे २८, विद्यामार्ग सूत्रे २२, संहार सूत्रे १५, संसरण सूत्रे २७, महावाक्य सूत्रे ९, निर्वचन सूत्रे २३, उद्धरण सूत्रे ६६, अस्तिपर सूत्रे ६ अशी एकूण २१७ सूत्रे होतात. यानंतर अस्तिपर हे आचरणीय प्रकरण मुख्य धरून या प्रकरणास जी सूत्रे मिळतील ती निवडली. त्याचे नाव आचार प्रकरण असे ठवले. आणि आठ प्रकरण मुख्य धरून त्यास जी सूत्रे मिळतील, ती सूत्रे ळीळा चरित्रांतून निवडली. त्यास विचार प्रकरण असे नांव दिले. 

एकंदरीत पूर्वी पंचकृष्ण, पंचनाम, प्रकरण, अन्यव्यावृत्ती, युगधर्म, विद्यामार्ग, संहार, संसरण, उध्दरण, असतीपरी व आचार, विचार, असा सूत्रपाठ केशिराज पंडितांनी तयार केला. त्यानंतर त्यांनी लीळाचरित्रातून श्रीचक्रधरोक्त ११४ दृष्टांत निवडून त्याचा अन्वय लावला. अशाप्रकारे केशिराजपंडितांनी तपशीलवार बारा प्रकरण अन्वय लावून तयार केले. तेच सर्व परमार्ग मंडळी अभ्यासीत होते . 

पुढे आचार्यांच्या पश्चात् शके १२३० मध्ये महाराष्ट्रात यवनांची स्वारी आली. त्यावेळी कविश्वरादि मंडळी कोकणात जात असता त्यांच्या हातातून सूत्रपाठ ग्रंथ गेला. देशात शांतता झाल्यावर कविश्वरव्यास कोकणातून परत मराठवाड्यांत आष्टी जि. बीड येथे आले. तेथ कविश्वरव्यासांनी आपल्या मंडळींना ठेवून वाकुडे हरिभट यांच्यासह रामदरा येथे आले. तेथे असताना वाकुडे हरि भट कविश्वर व्यासांना म्हणाले, “भटो परमार्गाच्या उपयोगासाठी शास्त्रान्वय लावा.। तुम्ही आचार्य आहात व तुम्ही आम्हाला भटासमान आहात.' यांच्या विनंतीवरून कविश्वरव्यासांनी चरित्रातील नवप्रकरणाची २०६ सूत्रे निवडून केशिराज बासाप्रमाणे अन्वय लावला. 

मग आचार प्रकरणाची २८९ सुत्रे निवडलो. त्यास त्यागस्थळ असे नाव ठेवले. विचार प्रकरणाची २८५ सुत्रे निवडली. त्यास वेधस्थळ असे नाव ठेवले. आणि पूर्वी पंचकृष्ण. पंचनाम, हे नवप्रकरणात न घालता स्वतंत्र केले, असा एकूण ७९१ वचनांचा सूत्रपाठ श्रीकविश्वरव्यासांनी तयार केला. तो सूत्रपाठ आष्टी येथे आल्यावर कविश्वरबासांनी परशुरामव्यासांना व रामेश्वर बासांना निरूपण केला. तो त्यांनी अभ्यासिला'

त्यानंतर परशरामबास व रामेश्वरबास एकांकी अटनासी गेले. मग केतुका एक दिसा आचार्य श्री परशुराम व्यासांनी  गोसावीयांचा श्रुती हेत ठाकला देखोनी लिळाचरीत्राची शोधनी करून असतीपर प्रकरणाच्या आधारे चरित्रातून १०० सूत्रे निवडली. त्यास धाकुटे आचार स्थळ ( संन्यास स्थळ ) नांव दिले. आणि नवप्रकरणाच्या आधारे १४३ वचने चरीत्रातुन निवडली. त्यास बोधस्थळ असे नांव दिले. 

अशाप्रकारे परशुराम व्यासांनी  चरित्रातून सूत्रे निवडली. ती त्यांनी क्षेमवार्ता प्रसंगी श्री कविश्वरव्यासांना वाचून दाखविली. त्यास त्यांनी मान्यता दिली. श्रीकविश्वरव्यासांनी तयार केलेली सूत्रे ७९१ आणि परशुराम व्यासांनी  त्यात २४३ वचनांची भर घालून १०३४ वचनांचा सूत्रपाठ तयार केला. तो समग्र पाठ विनायकव्यासांनी लिहून काढला.

श्री कविश्वरबास दिवंगत झाल्यावर परशरामबासांनी अजुनही गोसावीयांचा श्रुती हेत ठाकला आहे ऐसे देखोनी पुन्हा एकदा लीळाचरित्र शोधनी करुन चरित्रातून, आचार व आचार मालिकेची ५५० सूत्रे निवडली आणि विचार व विचार मालिकेची ५०० सूत्रे निवडली. असे एकूण १०५० आणि नवप्रकरणाचे २०६ पूर्वी, पंच कृष्ण, पंच नाम ११ असे एकूण १२६७ वचनाचा सूत्रपाठ श्रीपरशुराम व्यासांनी तयार केला.परशरामबासांनी नवा केलेला १०५० वचनाचा सूत्रपाठ तो घेवून ते पैठण येथे गेले. तेथे आनेराजपंडितांना व रामेश्वरव्यासांना सूत्रपाठ वाचून दाखविला.' 

रामेश्वरव्यास म्हणाले, 'हे कवनगा आचार्य उत्तम केले. परंतु अजुनही गोसावीयांचा श्रुती हेत ठाकला आहे असे जानोनी   रामेश्वरबासांनी विचार, व विचार मालिकेची आठशे सूत्रे चरित्रातून निवडली. आणि आचार व आचार मालिकेची एक हजार सूत्रे निवडली. असे एकूण १८०० (अठराशे) आणि श्री कविश्वरव्यासांनी तयार केलेली नव प्रकरणाची सूत्रे पूर्वी पंच कृष्णासहित २१७, असे सर्व मिळून २०१७ (दोन हजार सतरा) वचनाचा सूत्रपाठ श्री रामेश्वरव्यासांनी तयार केला. 

पुढे शके १२४८ मध्ये महाराष्ट्रावर महंमद तुघलकाची स्वारी झाली. त्यावेळेस सुंदर बोल्हाऊसांना सैनिकांनी धरून नेले. तिने धर्मभंग होईल म्हणून आडात उडी टाकली. तिच्याबरोबर परशुरामव्यास व रामेश्वरव्यासांनी लिहिलेला लीळाचरित्र व सूत्रपाठ ग्रंथ गेला. त्यानंतर मुखोग्दत असलेला सूत्रपाठ लिहून त्याचा अन्वय लावण्यात आला.

(सूत्रपाठ, लीलाचरित्र नाहीसे झाले म्हणून परशुरामव्यासांनी आपले शिष्य पेटे हरिव्यासांना लीला व सूत्रपाठ सांगितला. मग हरिव्यासांनी त्यांच्या देखतच लीळाचरित्र व सूत्रपाठ लिहून काढला.)

यानंतर श्री गुर्जर शिवव्यासांनी श्रीगुरूंच्या आज्ञेप्रमाणे सर्व शास्त्रांचा अन्वय लावला. परशुरामव्यासांचे वेळी लीळा चरित्राचे साठ पाठ तयार झाले होते, ते अचळ मुरारी व्यासांनी एकत्रित केले होते. पण एक पाठ तयार केला नव्हता. तो शिवव्यासांनी सर्व लीळेचा मतितार्थ घेऊन एक पाठ तयार केला. त्यास पिढीपाठ म्हणतात. हा पाठ तयार झाल्यानंतर खामनीकर नागोव्यासांनी या पाठाची प्रत तयार केली. ते शास्त्र उपाध्ये आम्नायाच्या मंडळींकडे आले आणि गुजरशिवव्यासांनी लिहिलेले शास्त्र, ते कविश्वर मंडळीकडे राहिले. 

नंतर श्री गुर्जरशिवव्यासांनी सूत्रपाठास अन्वय लाउन  पूर्वी पंचकृष्ण पंचनाम ११, अन्यव्यावृति १०, युगधर्म २८, विद्यामार्ग २२, संहार १५ संसरण २७, महावाक्य ९, निर्वचन २३, उद्धरण ६६, अस्तिपर ६, विचारवचने २८५ आणि आचार-वचने २८९, विचार मालिका वचने २०३, आचार मालिका वचने २५४, अशा प्रकारे १२४८ (बाराशे अठ्ठेचाळीस) वचनांचा सूत्रपाठ तयार केला. त्याचबरोबर स्मृति, वृद्धाचार, द्रुष्टांत लापिका, बाईदेवव्यासांचा पुजावसर व मूर्तिज्ञान, नामाचे दहाठाय हे संशोधन करून लिहिले. आणि एकांक, पूर्वाध व उत्तरार्ध, लीळाचरित्र, गोविंदप्रभू चरित्र, श्रीकृष्ण चरित्र, श्री दत्तात्रेय चरित्र आणि दृष्टांत पाठ आदिसहित (विषयानुक्रमे) क्रम लावला. आणि तोहि शुद्ध असा पाठ तयार केला. त्यास उपाध्य व कविश्वर मंडळींनी मान्यता दिली. 

आचार्य श्री गुर्जर शिवव्यासांच्या जीवनातील महत्त्वाचे कार्य म्हणजे सूत्रपाठावरील टीका होय. महानुभावात सूत्रपाठ हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा! तसेच सुत्रपाठावर जी टीका लिहिली, ती सुद्धा महत्त्वांची आचार्य श्री गुर्जर शिवबासांचे गुरु श्री अचळमुरारीबास व धाराशिवकर ओंकारव्यासाचे शिष्य सिद्धांते हरिव्यास या दोघांच्या विचारविनीमया नुसार सुमारे शके १३३५ मध्ये सूत्रपाठांवर टीका लिहिली. १२४८ सूत्रांपैकी नव प्रकरण सूत्र २०६, विचार प्रकरण २८५, आचार प्रकरण २८९ असे एकूण ७८० सूत्रांवर भाष्य लिहिले. भाष्य लिहितेवेळी इतर राहिलेल्या सूत्रांचा मतितार्थहि त्यातच लिहिला. व पुढे सोळाव्या शतकामध्ये चक्रपाणीव्यास बीडकर यांनी आचार मालिका-विचार मालिका या सूत्रांवर टिका लिहिली. .

श्रीसिद्धांते हरिव्यास व गुर्जर शिवव्यास यांनी लिहिलेल्या सूत्रपाठाच्या टीकेत २४ शास्त्रीय पंडितांची (ज्ञातांची) मते मांडली आहेत. त्यात इतर २२ व टीकाकर्त्यांचे दोन मत अशा प्रकारे त्यांनी एकूण २४ ज्ञातांच्या मतांचा सिद्धान्त मांडला.

या चोवीस ज्ञात्यांची मते एका सूत्रावर लिहिलेली नाहीत. या चोवीसमधून ज्या ज्ञात्यांचे ज्या सूत्रावर सुसंगत मत ठरेल, त्यांच्याच पक्षाचे मत लिहिले आहे. एखाद्या सूत्राचा निर्णय करीत असताना एकच सिद्धान्त लागत नाही. मग त्यावरच निर्णय थांबला असेल तर, त्यावर ज्यांची ज्यांची सैद्धान्तिक मते असतील, त्या त्या ज्ञात्यांच्या पक्षांची मते मांडली. उदाहरणार्थ, प्रेत देहाच्या आयुष्याचा एकच निर्णय लागला नाही म्हणून त्याविषयी रामेश्वरब्यास आणि परशुरामव्यास या दोन पंडितांचे मत तेथे मांडले. भाष्य लिहितेवेळी भाष्याचे तीन प्रकार केले. १) समहारी लक्षण, २) पदानुक्रमे भाष्य, ३) उपसंहारी भाष्य.

 समहारी लक्षण म्हणजे प्रकरणाच्या सर्व वचनांचा मतितार्थ लिहिणे. पदानुक्रमे म्हणजे सूत्रांच्या पदाचा अर्थ क्रमवार करणे. आणि उपसंहारी म्हणजे मागील सूत्रांच्या प्रश्नाचे उत्तर देऊन पुढे नवीन अर्थ सांगणे. इत्यादी प्रकार भाष्यात असून आणखी काही प्रकारही आहेत. अशा रितीने श्री गुर्जरशिवव्यास आणि श्री सिद्धान्ते हरिव्यास या दोघांनी स्वामी श्रीचक्रधरांच्या सूत्रावर भाष्य लिहिले. ते अत्यंत महत्त्वाचे होय.

 पंथामध्ये या तत्त्वज्ञानाला विशेष असे प्राधान्य  आहे. यानंतर किती एक काळा सुमारे १५ व्या शतकात अजुनही गोसाव्यांचा श्रुती हेत ठाकला आहे ऐसे जानोनी आचार्य श्री मुरारीमल्ल विद्वांस यांनी चरीत्राची चतुर्थ शोधनी करून आचार १८७ वचने, धाकुटे आचारस्थळ ४४ वचनें, विचार १४६ वचने, धाकुटे विचार स्थळ १२ वचने - असे एकूण ३८९ वचनांची शोधनी केली व स्वयं स्फुर्तीने त्या वचनासी लापीका तथा टीका लिहल्या तोच हा शोधनीचा पाठ होय.

लेखक :- पु. श्री. राजधरदादा बिडकर

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post