स्मृतीस्थळ चिंतन - स्मृती क्र. (७७) तथा अटनि सहाये - अनुवादु - महानुभाव पंथ इतिहास - Mahanubhavpanth history

स्मृतीस्थळ चिंतन - स्मृती क्र. (७७) तथा अटनि सहाये - अनुवादु - महानुभाव पंथ इतिहास - Mahanubhavpanth history

स्मृतीस्थळ चिंतन - 

स्मृती क्र. (७७) तथा अटनि सहाये - अनुवादु :

मनुष्य जीवन जगताना आपल्या कल्पकतेने नवनवीन स्वप्न रंगवतो व ते सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करतो मग प्रयत्न केले असता बहुतांशी जसे हवे तसे घडून येते परंतु जिवाला पुढील येणारा क्षण कसा असेल किंवा काळाच्या उदरात काय अनिष्ट दडले आहे याची जाणीव त्याला नसते किंबहूना जीव ते जाणू शकत नाही. याचे सध्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मागील काळात घडलेले कोरोनाचे  अनिष्टकारी संकट कारण असेही अकल्पित काही घडू शकते याची कल्पनाही कुणी केली नसेल.

म्हणून काळाच्या उदरात काय दडले आहे हे फक्त परमेश्वरच ते जाणतात आणि मग जो जीव सर्वार्थाने परमेश्वराला समर्पित आहे अशा आर्तवंत भक्ताला परमेश्वर सहाय्य करतात त्याचे अनिष्ट होण्यापासून वाचवतात. जसे एखाद्याने एखादी गोष्ट ठरवली असता तसे न घडता थोडे विरुद्ध घडले जाते त्यात त्याला थोडकी दुःखची झळ सोसावी लागते परंतु  कालांतराने त्याचे असे लक्षात येते की आपल्यासोबत जे घडले ते योग्यच झाले नाहीतर आपले अस्तित्वच धोक्यात आले असते. ज्याचा ईश्वरावर भाव (भार) आहे अशा जाणकार ईश्वर परायण जीवाला याची जाणीव होते व तो मनोमन त्या परमपिता परमेश्वराचे आभार मानतो.

ईश्वराने विहिलेल्या मार्गावर धर्माचरण करत असताना भगवंताची कृपा त्या साधकावर असतेच असते. कुठल्याही संकट प्रसंगी अगोदर सूचित होते व त्यातून तो बचावला जातो किंबहुना त्याचे मार्गात येणाऱ्या अडचणी संकटांचे निवारण अगोदरच होते याचा बोध खालील स्मृतीतून होतो.

उंबरी गावची गौराईसाने भटोबासांचे सांगणेवरून अटन, विजन, भिक्षा, भोजन असा विधीवर राहून आचार केला व तो करत असताना कोथळोबासांच्या निमित्ताने गौराईसाला असतीपतिचे श्रवण झाले. त्या नंतर अटनक्रमे पुढील गावी गेले नंतर रस्त्याने जात असताना गौराईसाला एका बाभळीचा काटा पायात मोडला आणि त्यामुळे तिला चालता येईना पुढील गाव लांब असलेमुळे मग आता काय करावे म्हणून देवाचे स्मरण चिंतन करत रस्त्याच्या कडेला बसली.

मग अटनक्रमे ज्या गावी जायचे होते त्या गावच्या दिशेने एक घोडेस्वार आला. तो धार्मिक होता. मग गौराईसाला वाटेत बसलेले त्याने पाहिले व घोडे थांबवून विचारले आई,  "आपण कव्हणा मार्गिचे, कव्हणा गावा जाता" यावर गौराईसा म्हणतात आम्ही भटमार्गीचे म्हणजे परमेश्वर मार्गीचे साधू आहोत आम्हाला पुढच्या गावी जायचे आहे.

त्यावर तो घोडेस्वार म्हणतो आई, आपण पुढील गावी जाऊ नका तेथे यवनांची धाडी आली आहे. आपण पुन्हा मागच्या गावाला जाऊ असे म्हणून तो खाली उतरला आणि गौराईसाला चालता येत नसलेमुळे त्यांना विनंती करून घोड्यावर बसविले आणि स्वतः मागे चालत राहिला व गौराईसाला त्याने मागील गावच्या वेशी पर्यंत आणून सोडले आणि पुढे निघून गेला.

पुढे काही काळाने ही वार्ता भटोबासांच्या कानावर आली त्यावर भटोबास म्हणतात. "गौराईसाला थोर सहाय्य झाले गा" म्हणजे अटन, विजन करताना परमेश्वर साधकाच्या सोबत असतो त्याला कितीही संकटे आली काटा मोडला तरी परमेश्वर त्याचा रक्षणकर्ता आहे.

म्हणून अटन, विजन करताना भिक्षा मिळेल की नाही किंवा विश्रांतील कुठे जागा मिळेल की नाही याचा विचार साधक करत नाही. तो परमेश्वराच्या भरवशावर असतो. अटन, विजन करताना पुन्हा माघारी येणे होईल की नाही याचा विचार न करता अटन प्रसंगी तो देह गेले तरी चालेल अशा विचाराने तो विधी करतो. आणि म्हणून भटोबासांचे आज्ञेवरून गौराईसा अटनास निघाली परंतु तिच्यावर आलेले संकट ईश्वर सहाय्याने दूर झाले. 


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post